Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबई

भेसळखोरांवर FDA ची धडक; दोन दिवसांत ४.४५ कोटींचा संशयास्पद अन्नसाठा जप्त

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यव्यापी मोहीम; पुणे, अहिल्यानगर, नाशिक, बुलढाण्यात मोठी कारवाई

मुंबई : गणेशोत्सव आणि आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कडक मोहीम सुरू केली आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या राज्यव्यापी कारवाईत अवघ्या दोन दिवसांत तब्बल ४ कोटी ४५ लाख रुपयांचा संशयास्पद आणि भेसळयुक्त अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. पुणे, अहिल्यानगर, नाशिक आणि बुलढाणा जिल्ह्यांत झालेल्या कारवाईमुळे भेसळखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.

अहिल्यानगरमध्ये ३.९५ कोटींचे बटर जप्त

अहिल्यानगरच्या एमआयडीसी परिसरातील ‘अरिहंत कोल्ड स्टोरेज’वर FDAच्या पथकाने धाड टाकली. यावेळी हलक्या दर्जाचे तसेच लेबलिंगच्या नियमांचे उल्लंघन करणारे तब्बल ७५ हजार ३५६ किलो पाश्चराईज्ड कुकिंग बटर जप्त करण्यात आले. या साठ्याची बाजारातील किंमत सुमारे ३ कोटी ९५ लाख ६२ हजार रुपये आहे. बटरचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

पुण्यात पनीर, दही आणि खव्यावर कारवाई

कर्नाटकातून पुण्यात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात संशयास्पद पनीर, खवा आणि दही आणले जात असल्याची माहिती FDAला मिळाली होती. त्यानंतर पाच दिवस पाळत ठेवून बुधवार पेठ परिसरात कारवाई करण्यात आली.

दोन वाहनांमधून अस्वच्छ आणि गंजलेल्या परिस्थितीत तसेच तापमान नियंत्रणाशिवाय पनीर आणि दह्याची वाहतूक होत असल्याचे आढळले. अनेक पिशव्यांवर उत्पादन तारीख, एक्स्पायरी डेट आणि बॅच नंबर नसल्याचेही निदर्शनास आले.

बुधवार पेठेतील ‘के. बी. अगरवाल’ पेढीतून ४ हजार ६२७ किलो बिनलेबलचा खवा जप्त करण्यात आला. नाशवंत असल्याने हा खवा हडपसर येथे नष्ट करण्यात आला. पुण्यातील कारवाईत एकूण १८ हजार ७० किलो साठा, अंदाजे ४३.२७ लाख रुपये किमतीचा, जप्त करण्यात आला असून ६९ नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

हेही वाचा –  राज्यातील १८ जिल्ह्यांत दुष्काळसदृश स्थिती; पिकांच्या नुकसानीचा तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश

नाशिकमध्ये २१५५ किलो बर्फी नष्ट

गुजरातहून लक्झरी बसमधून आणली जाणारी २ हजार १५५ किलो ‘स्पेशल स्वीट बर्फी’ नाशिकच्या द्वारका चौकात जप्त करण्यात आली. सुमारे ५.५८ लाख रुपये किमतीचा हा साठा अस्वच्छ परिस्थितीत वाहतूक केला जात असल्याने तो जागीच नष्ट करण्यात आला.

बुलढाण्यात विनापरवाना दूध केंद्रावर धाड

बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील येरळी येथील दूध केंद्रावरही FDAने कारवाई केली. विनापरवाना व्यवसाय, अस्वच्छता आणि प्राथमिक चाचण्यांचा अभाव आढळल्याने संशयास्पद गाई-म्हशीचे दूध जप्त करून नष्ट करण्यात आले.

‘नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही’

FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शासनाची भूमिका कठोर असल्याचे स्पष्ट केले. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. मुदतबाह्य, फेरफार केलेले किंवा निकृष्ट अन्नपदार्थ विकणाऱ्यांविरोधात कडक कायदेशीर कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका किंवा भेसळीचा संशय असल्यास नागरिकांनी FDAच्या १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर किंवा अधिकृत तक्रार पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button