‘एक सरकार BRICSमध्ये, तर दुसरं लंडनमध्ये वडापाव खातंय’; संजय राऊतांचा सरकारवर घणाघात
मराठा आरक्षण आणि दुष्काळाच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा; ‘दोन्ही प्रश्नांकडे पाहायला सरकारला वेळ नाही’

मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाअभावी पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी अडचणीत आहेत. त्याचवेळी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडेही सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप राऊत यांनी केला.
मराठा समाजाची अंतरवाली सराटी येथे आज महत्त्वाची बैठक होत असून, मुंबईत जाऊन आंदोलन करण्याबाबत पुढील दिशा या बैठकीत ठरवली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
‘मराठवाड्यात परिस्थिती चिंताजनक’
संजय राऊत म्हणाले की, मराठवाड्यात कोरड्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीनसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ६० दिवसांहून अधिक काळ पाऊस नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले असून लोकांमध्येही अस्वस्थता आहे. या दोन्ही प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
यावेळी राऊत यांनी सरकारच्या विविध दौऱ्यांवरूनही टोला लगावला. “एक सरकार ब्रिक्समध्ये बिझी आहे, तर दुसरे सरकार लंडनच्या रस्त्यावर वडापाव खात फिरत आहे,” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली.
हेही वाचा – ‘जरांगे नव्हे, दुष्काळाचा मुद्दा महत्त्वाचा’; चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य
कर्जमाफीवरूनही निशाणा
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरूनही संजय राऊत यांनी सरकारला लक्ष्य केले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेली कर्जमाफी आणि सध्याच्या सरकारच्या कर्जमाफीमध्ये जमीन-अस्मानाचा फरक असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावरूनही राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत मोठी गर्दी असते. अशा परिस्थितीत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर अतिरिक्त ताण येऊ शकतो, असे ते म्हणाले.




