लंडनमध्ये महाराष्ट्राच्या विकासाचे संकल्पचित्र : ‘डिझाइन इन लंडन, मॅन्युफॅक्चर इन महाराष्ट्र’
ब्रिटनमधील उद्योजकांना गुंतवणुकीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

लंडन | महाराष्ट्रात सुरू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे उद्योग आणि गुंतवणुकीसाठी मोठ्या संधी निर्माण झाल्या असून, ब्रिटनमधील उद्योजकांनी राज्यात गुंतवणूक करावी, असे आवाहन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
लंडन येथे आयोजित ‘इन्व्हेस्ट इन महाराष्ट्र’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी ब्रिटनमधील उद्योजकांसमोर महाराष्ट्राच्या विकासाचे संकल्पचित्र मांडले. ‘डिझाइन इन लंडन आणि मॅन्युफॅक्चर इन महाराष्ट्र’ या संकल्पनेच्या माध्यमातून ब्रिटनमधील तंत्रज्ञान, संशोधन आणि कल्पकतेची सांगड महाराष्ट्रातील उत्पादनक्षमतेशी घालता येईल, असे त्यांनी सांगितले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात विकसित करण्यात येणारी ‘तिसरी मुंबई’, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक, वाढवण बंदर, मुंबई कोस्टल रोड आणि अटल सेतू यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा त्यांनी यावेळी उल्लेख केला. या प्रकल्पांमुळे राज्यातील दळणवळण अधिक वेगवान होण्यासह औद्योगिक विकासाला चालना मिळणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य; पुढील आठ दिवसांत कारवाईला सुरुवात : मुख्यमंत्री फडणवीस
फिनटेक, हरित ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन आणि कौशल्य विकास या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र आणि ब्रिटनदरम्यान व्यापक सहकार्याची क्षमता असल्याचेही त्यांनी नमूद केले. उपलब्ध पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ आणि उद्योगपूरक वातावरणामुळे महाराष्ट्र हे जागतिक गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे केंद्र ठरत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारत आणि ब्रिटनदरम्यान झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे द्विपक्षीय व्यापार व गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. या संधींचा लाभ घेत ब्रिटनमधील अधिकाधिक उद्योजकांनी महाराष्ट्रात उद्योग उभारावेत आणि राज्याच्या विकासयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन शिंदे यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत वेगाने प्रगती करत असून, देशाच्या या विकासयात्रेत महाराष्ट्र अग्रस्थानी असल्याचे शिंदे म्हणाले. महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांची माहिती आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडली जात असल्याने राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक क्षमतेला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.




