गणेशोत्सवापूर्वी पुण्यात FDAची धडक कारवाई; ३८ लाखांचा खवा-पनीर जप्त

पुणे | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात शुक्रवारी भेसळयुक्त खवा आणि पनीरविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली. बुधवार पेठेत सकाळपासून सुरू असलेल्या या धडक मोहिमेत बार्शीहून आलेला तब्बल ४ हजार ६०० किलो खवा नष्ट करण्यात येत असून, कर्नाटकातून आलेल्या १२ हजार ५०० किलो पनीरचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. आतापर्यंत सुमारे ३८ लाख रुपयांचा माल कारवाईच्या कक्षेत आला असून, प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कारवाई निश्चित केली जाणार आहे.
पुण्याच्या बाजारपेठेत पहाटेपासूनच कर्नाटक भागातून पनीरचे ट्रक येतात. त्यानंतर शहरातील विविध डेअरी उद्योगांमध्ये ते वितरित केले जातात. मात्र, आज, शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजल्यापासूनच अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी बुधवार पेठ आणि शुक्रवार पेठ परिसरात डेरे दाखल झाले होते. ट्रकमधून आलेला माल दुकानात जाण्याऐवजी अधिकाऱ्यांनी तो ताब्यात घेण्यास सुरुवात केली. या कारवाईत बार्शी येथून पुण्यात आलेला तब्बल ४ हजार ६०० किलो खवा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला असून, तो पूर्णपणे नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या धडक कारवाईत अन्न व औषध प्रशासनाचे १२ ते १३ अधिकारी सक्रिय आहेत. कर्नाटक आणि बार्शी या भागांतून पुण्यात येणाऱ्या खवा आणि पनीरच्या साठ्यांची तपासणी करण्यात येत आहे. संशयित माल ताब्यात घेऊन त्याचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
हेही वााचा
लंडनमध्ये महाराष्ट्राच्या विकासाचे संकल्पचित्र : ‘डिझाइन इन लंडन, मॅन्युफॅक्चर इन महाराष्ट्र’
गणेशोत्सवाच्या काळात खवा, पनीर आणि इतर दुग्धजन्य पदार्थांना मोठी मागणी असते. या पार्श्वभूमीवर, शहरात मोठ्या प्रमाणावर खवा आणि पनीर बाहेरच्या राज्यांतूनही येतो. यापूर्वीही प्रशासनाने पुणे विभागात बनावट खवा आणि पनीरवर मोठी कारवाई केली होती. मात्र, आजच्या कारवाईचे आदेश दहा ते बारा दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाच्या मुख्य कार्यालयाकडून म्हणजेच मुंबईकडून काढण्यात आले होते. त्या संदर्भात पुणे अन्न विभाग येथील अन्न व औषध प्रशासन अधिकारी सहायक आयुक्त याविषयीचे तपशील जमा करत होते, अशी माहिती पुणे विभागातील सूत्रांनी दिली.





