इशान किशनचा द्विशतकी धमाका! तब्बल १३ वर्षांनंतर ईस्ट झोन दुलीप ट्रॉफीचा चॅम्पियन

Duleep Trophy Final | देशांतर्गत क्रिकेटमधील मानाच्या दुलीप ट्रॉफी २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ईस्ट झोन संघाने ऐतिहासिक कामगिरी करत जेतेपदावर नाव कोरले आहे. कर्णधार इशान किशनच्या नेतृत्वाखाली ईस्ट झोनने साऊथ झोनविरुद्धचा अंतिम सामना अनिर्णित राखत पहिल्या डावातील भक्कम आघाडीच्या बळावर विजेतेपदाचा मान पटकावला. ईस्ट झोनने तब्बल १३ वर्षांनंतर दुलीप ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केला असून, या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो स्वतः कर्णधार इशान किशन.
इशान किशनचे वादळी द्विशतक
अंतिम सामन्यात ईस्ट झोनच्या फलंदाजांनी पहिल्या दिवसापासूनच साऊथ झोनच्या गोलंदाजांवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. पहिल्या डावात ईस्ट झोनने ७०८ धावांचा महाकाय डोंगर उभारला. यामध्ये कर्णधार इशान किशनने २७० धावांची अप्रतिम द्विशतकी खेळी साकारली, तर कुमार कुशाग्रने १०१ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना साऊथ झोनचा पहिला डाव अवघ्या ३३६ धावांवर गारद झाला. साऊथ झोनकडून कर्णधार तिलक वर्माने ९९ आणि देवदत्त पडिक्कलने ६२ धावा करून लढा देण्याचा प्रयत्न केला, मात्र इतर फलंदाजांनी नांगी टाकली.
हेही वाचा
दुसऱ्या डावातही वर्चस्व
पहिल्या डावात ३७२ धावांची भक्कम आघाडी मिळाल्यानंतर ईस्ट झोनने दुसऱ्या डावातही फटकेबाजी सुरू ठेवली. कुरेशीच्या ११६ धावा आणि इशान किशनच्या नाबाद ८० धावांच्या जोरावर ईस्ट झोनने दुसऱ्या डावात ३८८ धावा उभारल्या. सामन्याच्या अंतिम दिवशी निकालाची शक्यता उरली नसल्याने दोन्ही कर्णधारांनी सामंजस्याने सामना अनिर्णित (ड्रॉ) घोषित केला. मात्र, पहिल्या डावातील प्रचंड आघाडीच्या निकषावर ईस्ट झोनला अधिकृतपणे विजेता घोषित करण्यात आले.
इशान किशन ठरला सामनावीर, तर तिलक वर्मा मालिकावीर
अंतिम सामन्यातील दोन्ही डावांत मिळून ३५० धावा (२७० आणि ८०) कुटणाऱ्या इशान किशनला सामनावीर (मॅन ऑफ द मॅच) पुरस्काराने गौरवण्यात आले. तर संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या साऊथ झोनचा कर्णधार तिलक वर्मा मालिकावीर (मॅन ऑफ द सिरीज) पुरस्काराचा मानकरी ठरला. कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारत संघाला १३ वर्षांनंतर चॅम्पियन बनवणाऱ्या इशान किशनच्या या खेळीचे क्रिकेट वर्तुळात जोरदार कौतुक होत आहे.




