आर. के. एल. गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूलचे चमकदार यश; चौथ्या राज्यस्तरीय लाठी-काठी स्पर्धेत पटकावले उपविजेतेपद!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :
‘असोसिएशन ऑफ गतका, महाराष्ट्र’ यांच्या वतीने लोणावळा येथील सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये २८ ते ३० ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या राज्यस्तरीय महाराष्ट्र गतका अजिंक्यपद व लाठी-काठी स्पर्धेत पिंपरी-चिंचवड येथील
आर. के. एल. गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अद्भूत कामगिरी करत उपविजेतेपद (सर्वसाधारण द्वितीय क्रमांक) पटकावले. शाळेतील बालखेळाडूंनी आपल्या तंत्रशुद्ध कौशल्याच्या जोरावर तब्बल ४७ पदकांची कमाई केली.
तीन दिवस चाललेल्या या रंगतदार स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये आर. के. एल. गॅलेक्सीच्या विद्यार्थ्यांनी विविध वयोगटांत उत्कृष्ट कामगिरी नोंदवली:
हेही वाचा – रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी; १० ते २५ सप्टेंबरदरम्यान मिळणार मोफत धान्य

पदकतालिका: २२ सुवर्ण, १८ रौप्य आणि ७ कांस्यपदकांसह एकूण ४७ पदके.
११ वर्षांखालील गट (मुले व मुली): उत्कृष्ट मैदानी प्रात्यक्षिके आणि शिस्तीच्या जोरावर सुवर्णपदकांची लयलूट केली.
१४ वर्षांखालील गट (मुले व मुली): तंत्रशुद्ध लाठी-काठी कौशल्यांचे शानदार प्रदर्शन करत पदकतक्त्यात वर्चस्व राखले.या राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे जिल्ह्याने प्रथम क्रमांक (सर्वसाधारण विजेतेपद) पटकावला, तर आर. के. एल. गॅलेक्सी स्कूलच्या जोरावर पिंपरी-चिंचवडने द्वितीय क्रमांक, रायगड जिल्ह्याने तृतीय आणि सोलापूर जिल्ह्याने चतुर्थ क्रमांक पटकावला.स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण असोसिएशनचे अध्यक्ष संतोष चौधरी आणि प्रतिभा चौधरी यांच्या उपस्थितीत पार पडले. ही संपूर्ण स्पर्धा जनरल सेक्रेटरी प्रो. आरती चौधरी यांच्या मुख्य देखरेखीखाली पार पडली. स्पर्धेचे टेक्निकल नियोजन प्रो. स्वाती मॅगिरी, प्रो. जैद काजी, प्रथमेश म्हात्रे, मानसी पवार, स्मित चौधरी, मंथन पवार, अथर्व नलावडे व १८ पंचांनी पाहिले, तर मीडिया इन्चार्ज म्हणून रोहन पवार व प्रेम पोटे यांनी जबाबदारी सांभाळली.विजेत्या सर्व बालचॅम्पियन्सना प्रशिक्षक रवी सर आणि रुपाली मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या ऐतिहासिक यशाबद्दल शाळा व्यवस्थापन, शिक्षक वृंद आणि पालकांकडून विजेत्या खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे कौतुक होत आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“आर. के. एल. गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय लाठी-काठी स्पर्धेत मिळवलेले हे यश अत्यंत अभिमानास्पद आहे. आपल्या पारंपरिक मैदानी खेळांमध्ये आपल्या मुलांनी दाखवलेली शिस्त आणि तंत्रशुद्ध कौशल्य कौतुकास्पद आहे. प्रशिक्षक रवी सर आणि रुपाली मॅडम यांनी मुलांवर घेतलेले कष्ट आणि शाळेचे प्रोत्साहन यामुळेच हे उपविजेतेपद शक्य झाले आहे. सर्व विजेत्या बालखेळाडूंचे मनापासून अभिनंदन!”
– विपुल कुलकर्णी (पालक)
“मुली आणि मुलांनी ११ व १४ वर्षांखालील गटात ४७ पदकांची कमाई करत शाळेचा आणि पिंपरी-चिंचवडचा डंका राज्यभरात वाजवला आहे, याचा एक पालक म्हणून मला खूप आनंद होत आहे. लाठी-काठीसारख्या महाराष्ट्राच्या पारंपरिक खेळांमध्ये मुलांची अशी दैदिप्यमान कामगिरी पाहणे हा एक सुखद अनुभव आहे. या यशाचे सर्व श्रेय विद्यार्थ्यांची मेहनत, प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन आणि शाळा व्यवस्थापनाला जाते.”
– वैशाली घुटे (पालक)




