महापौर रवी लांडगे यांचा आंबेगावातील २५० कुटुंबांना मदतीचा हात
भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

मायबावडी, महाळुंगे आणि आंबेगाव कटकार वस्ती येथे मदत किटचे वाटप
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसाच्या शुभेच्छांना लोकसेवेची जोड देण्याच्या भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांनी आंबेगाव तालुक्यात मदतकार्याचा पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकारातून मायबावडी, महाळुंगे आणि आंबेगाव कटकार वस्ती येथील एकूण २५० गरजू कुटुंबांना मदत किटचे वाटप करण्यात आले.
‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या उपक्रमासाठी महापौर लांडगे यांनी आंबेगाव तालुक्यातील दुर्गम भागाची निवड केली. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी तीन ठिकाणी मदत किटचे वाटप केले. शहरातील कार्यकर्त्यांच्या सहभागातून ग्रामीण भागातील कुटुंबांपर्यंत मदत पोहोचविण्यावर या उपक्रमात भर देण्यात आला.
हेही वाचा
साबळेवाडी, राजेवाडीतील आदिवासी कुटुंबांना सानप दांपत्याचा मदतीचा हात

आमदार महेश लांडगे यांनी यंदा वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आयोजित न करण्याचा निर्णय घेतला होता. त्याऐवजी गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले होते. त्या आवाहनाला महापौर रवी लांडगे यांनी प्रत्यक्ष मदतकार्याची जोड दिली. भाजपच्या ‘सेवा ही संघटन’ या मूलमंत्राला कृतीत उतरविणाऱ्या महापौर लांडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आमदार महेश लांडगे यांनी आभार मानले.
“महेशदादांनी यंदा वाढदिवसाच्या शुभेच्छांना सेवेची जोड देण्याचं आवाहन केलं. त्या आवाहनाला प्रतिसाद देताना आंबेगाव तालुक्यातील दुर्गम भागापर्यंत मदत पोहोचवायची, असं आम्ही ठरवलं. मायबावडी, महाळुंगे आणि आंबेगाव कटकार वस्तीतील २५० कुटुंबांपर्यंत सहकाऱ्यांच्या मदतीने पोहोचता आलं. या मदतीने एखाद्या कुटुंबाची रोजची चिंता थोडी जरी हलकी झाली, तरी महेशदादांना दिलेल्या शुभेच्छांना खरा अर्थ मिळेल.”
– रवि लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड, पुणे.




