LSEमध्ये श्रीकांत शिंदेंचा नवा शैक्षणिक प्रवास; डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर उभं राहताना म्हणाले, ‘आज इथे मी सर्वप्रथम एक विद्यार्थी’
ऑर्थोपेडिक्समधील MSनंतर TRIUM ग्लोबल MBAला सुरुवात; ‘नवीन ज्ञान महाराष्ट्र आणि देशाच्या सेवेत प्रभावीपणे वापरेन’

मुंबई : कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSE) येथे TRIUM ग्लोबल एमबीए प्रोग्रामच्या पहिल्या मॉड्यूलला सुरुवात केली आहे. कॅम्पसमध्ये पोहोचल्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर उभे राहण्याचा अनुभव त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे शेअर केला आहे.
ऑर्थोपेडिक्समधील MS पूर्ण केल्यानंतर ही त्यांची दुसरी पदव्युत्तर पदवी असल्याचे त्यांनी नमूद केले. वैद्यकीय शिक्षणामुळे रुग्णांवर उपचार करण्याचे कौशल्य मिळाले, तर नव्या शैक्षणिक प्रवासातून आर्थिक समस्या आणि धोरणे समजून घेण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
‘बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर उभे राहण्याचा क्षण मनाला स्पर्शून गेला’
श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, LSEमध्ये TRIUM ग्लोबल MBA प्रोग्रामच्या पहिल्या मॉड्यूलचा पहिला दिवस पार पडला. कॅम्पसमध्ये पाऊल ठेवल्यानंतर अनेक गोष्टींनी लक्ष वेधून घेतले, मात्र भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर उभे राहण्याचा क्षण मनाला सर्वाधिक स्पर्शून गेला.
अस्पृश्यतेमुळे अनेक दशकांपूर्वी ज्यांना वर्गाच्या बाहेर बसावे लागले, त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच ऐतिहासिक संस्थेत प्रवेश घेतला. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ हा प्रबंध लिहून ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (DSc) ही पदवी मिळवली. पुढे त्यांनी भारताला संविधान दिले आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेचा पाया रचला, असे शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.
हेही वाचा – गणेशभक्तांसाठी सरकारचा मोठा उपक्रम; राज्यभर २० लाख भाविकांची मोफत आरोग्य तपासणी
‘आज इथे मी सर्वप्रथम एक विद्यार्थी’
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे’ या विचाराचा दाखला देत शिंदे यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या पुतळ्यासमोर उभे राहिल्यानंतर या विचाराचा खरा अर्थ आणि गांभीर्य उमगल्याचे त्यांनी म्हटले आहे.
‘कल्याण आणि महाराष्ट्राचा लोकप्रतिनिधी असलो तरी आज इथे मी सर्वप्रथम एक विद्यार्थी आहे,’ असे त्यांनी नमूद केले. ज्या सभागृहांमध्ये बाबासाहेबांच्या विचारांचे वलय निर्माण झाले, तिथे उभे राहताना शांत अभिमान आणि विचारांच्या ताकदीची जाणीव झाल्याचेही त्यांनी सांगितले.
ऑर्थोपेडिक्सनंतर आर्थिक आणि धोरणात्मक शिक्षण
ऑर्थोपेडिक्समधील MS पूर्ण केल्यानंतर TRIUM ग्लोबल MBA ही त्यांची दुसरी पदव्युत्तर पदवी आहे. वैद्यकीय शिक्षणामुळे रुग्णांवर उपचार करण्याचे आणि त्यांना जीवन देण्याचे कौशल्य मिळाले, तर हा नवीन शैक्षणिक प्रवास गुंतागुंतीच्या आर्थिक समस्या आणि धोरणे समजून घेण्यास मदत करेल, असे शिंदे यांनी सांगितले.
‘विषय बदलला असला तरी शिकण्याची माझी उत्सुकता तीच आहे. मी नेहमीच मनापासून एक विद्यार्थी राहिलो आहे आणि ही शिकण्याची प्रक्रिया कधीही थांबणार नाही,’ असे त्यांनी म्हटले आहे.
‘नवे ज्ञान महाराष्ट्र आणि देशाच्या सेवेत वापरेन’
कॉलेजचे दिवस, व्याख्याने आणि वैचारिक चर्चांचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. मात्र, यावेळी अनुभवाची जोड असल्याचे शिंदे यांनी सांगितले. या शिक्षणातून मिळणारे ज्ञान आणि अनुभव आपल्या कार्यात, महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या सेवेत प्रभावीपणे वापरता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तरुणांना संदेश देताना त्यांनी कोणतीही पदवी, नोकरी किंवा पद मिळाले तरी शिकणे कधीही थांबवू नका, असे आवाहन केले. ‘मानवी मनाचे संवर्धन हेच मानवी अस्तित्वाचे अंतिम ध्येय असले पाहिजे,’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा उल्लेख करत त्यांनी बदलत्या जगात नेहमी उत्सुक राहून नवनवीन गोष्टी शिकत राहण्याचा सल्ला तरुणांना दिला.




