मनोज जरांगे पाटलांना शिवसेना मंत्र्यांचा इशारा; ‘राजकारण करायचं असेल तर जशास तसं उत्तर देऊ’
एकनाथ शिंदेंवरील टीकेचा मंत्र्यांकडून निषेध; ‘मराठा समाजाला सरकारची भूमिका मान्य, वस्तुस्थिती न जाणता वातावरण निर्माण करू नका’

मुंबई : मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेवरून शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली आहे. शिंदे हे समाजात भांडणे लावत असून दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास त्यांना जबाबदार धरले जाईल, या जरांगे यांच्या विधानाचा शिवसेनेच्या मंत्र्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.
उद्योगमंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जरांगे यांच्या भूमिकेवर पलटवार केला. यापुढेही जरांगे पाटील यांच्या टीकेला जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा मंत्र्यांनी दिला.
‘जरांगेंची टीका मराठा समाजाला पसंत नाही’
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी जरांगे यांच्या एकनाथ शिंदे यांच्यावरील टीकेवर नाराजी व्यक्त केली. मराठा समाजाच्या प्रश्नांवर सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असून, अशा प्रकारची टीका समाजाला रुचणारी नसल्याचे त्यांनी म्हटले.
फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनीही आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न मांडणे आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप करणे यात फरक असल्याचे सांगितले. जरांगे यांना राजकारण करायचे असेल तर आम्हीही त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा त्यांनी दिला.
‘जरांगे यांचे पाठीराखे असतील तर आम्हीही शिंदेंचे पाठीराखे’
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने नोंदणी प्रमाणपत्र दिले जात नसल्याचा अपप्रचार केला जात असल्याचा आरोप केला. सरकारकडून संबंधित प्रक्रिया राबवली जात असून, वस्तुस्थितीची माहिती न घेता सरकारविरोधात वातावरण निर्माण केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
‘जरांगे यांचे पाठीराखे असतील तर आम्हीही शिंदे यांचे पाठीराखे आहोत,’ असे म्हणत सामंत यांनी जरांगे यांच्या भूमिकेवर निशाणा साधला.
‘आरक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांवरच टीका’
पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनीही जरांगे यांच्या भूमिकेवर टीका केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि त्याबाबत निर्णय घेणाऱ्या व्यक्तींवरच जरांगे शिवीगाळ करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने घेतलेल्या भूमिकेचा विचार न करता केवळ टीका करणे योग्य नसल्याचे पाटील यांनी सांगितले. महायुती सरकारने मराठा समाजासाठी विविध सोयी-सुविधा आणि योजना उपलब्ध करून दिल्याचा दावाही त्यांनी केला.
‘चर्चेतून तोडगा काढण्याची शिंदेंची भूमिका’
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असतानाही मराठा समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने सहकार्याची भूमिका घेतली आहे. जरांगे पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर चर्चेतून तोडगा काढण्याचीच शिंदे यांची भूमिका राहिली आहे.
दरम्यान, जरांगे पाटील यांच्या एकनाथ शिंदे यांच्यावरील वक्तव्यावरून शिवसेना मंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.




