MPSC उमेदवारांना मोठा दिलासा! राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांची फेरपडताळणी करण्याची संधी
2, 6, 11 गुणांवरून उठलेल्या प्रश्नांनंतर आयोगाचा निर्णय; 10 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 च्या उमेदवारांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्य परीक्षेतील गुणांमध्ये मोठी तफावत आढळून आल्याने विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची दखल घेत आयोगाने उमेदवारांना गुणांच्या फेरपडताळणीची संधी उपलब्ध करून दिली आहे.
इच्छुक उमेदवारांना आयोगाने निश्चित केलेल्या ऑनलाइन प्रक्रियेद्वारे 10 सप्टेंबर 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. गुणपडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरची अंतिम परिस्थिती उमेदवारांच्या प्रोफाइलमध्ये थेट उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे MPSCने स्पष्ट केले आहे.
2, 6 अन् 11 गुणांमुळे निर्माण झाला होता संभ्रम
MPSCने 25 ऑगस्ट 2026 रोजी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 च्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर केला. निकालानंतर मुलाखतीसाठी अपात्र ठरलेल्या काही उमेदवारांच्या गुणांमध्ये मोठी तफावत आढळून आली.
मुख्य परीक्षेतील काही पेपरमध्ये 250 पैकी 2, 6, 11 आणि 14 असे अत्यल्प गुण मिळाल्याचे समोर आले. एका उमेदवाराला भाषा, निबंध आणि सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये 100 पेक्षा अधिक गुण मिळाले असताना, वैकल्पिक विषयाच्या एका पेपरमध्ये अवघे 2 गुण मिळाल्याचे निदर्शनास आले.
या प्रकारामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करत विद्यार्थ्यांनी आयोगाकडे लेखी तक्रारी आणि संबंधित पुरावे सादर केले होते. त्यानंतर आयोगाने गुणपडताळणीची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – दहीहंडी फुटली अन् विद्यार्थ्यांच्या हाती आली पुस्तके!
‘फेरपडताळणी’ की केवळ गुणांची बेरीज?
आयोगाने गुणपडताळणीची संधी दिली असली तरी उमेदवारांमध्ये अद्याप असंतोष आहे. उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन किंवा प्रत्यक्ष फेरतपासणी करण्याऐवजी केवळ ‘गुणांची फेरपडताळणी’ केली जाणार असल्याचे आयोगाच्या निर्णयातून स्पष्ट होते.
केवळ गुणांची बेरीज तपासल्याने मूळ प्रश्न सुटणार नाही. 2 किंवा 6 यांसारखे अत्यल्प गुण देण्यात आलेल्या उत्तरपत्रिकांची पारदर्शकपणे प्रत्यक्ष फेरतपासणी करावी, अशी मागणी काही उमेदवारांकडून करण्यात येत आहे.
10 सप्टेंबरपर्यंत अर्जाची संधी
गुणपडताळणीसाठी इच्छुक उमेदवारांनी MPSCच्या अधिकृत संकेतस्थळावर आपल्या लॉगिन प्रोफाइलद्वारे विहित शुल्क भरून ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 10 सप्टेंबर 2026 आहे.
गुणपडताळणीनंतरचा तपशील उमेदवाराच्या प्रोफाइल डॅशबोर्डवर उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




