पोलीस भरतीसाठी आता वार्षिक वेळापत्रक; भरती प्रक्रिया पारदर्शक आणि कालबद्ध करण्याचे योगेश कदम यांचे निर्देश
उमेदवारांना पूर्वतयारीसाठी मिळणार पुरेसा वेळ; लेखी परीक्षा, मैदानी चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि नियुक्ती प्रक्रियेचे नियोजन करण्यावर भर

मुंबई : राज्यातील पोलीस भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ, सुव्यवस्थित आणि कालबद्ध करण्यासाठी वार्षिक भरती वेळापत्रक तयार करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश राज्यमंत्री (गृह) योगेश कदम यांनी दिले. उमेदवारांना भरती प्रक्रियेची निश्चित माहिती वेळेत मिळावी आणि पूर्वतयारीसाठी पुरेसा कालावधी उपलब्ध व्हावा, यासाठी भरतीचे नियोजन अधिक प्रभावी करण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
मंत्रालयात राज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २०२५-२६ मधील पोलीस भरती प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार बच्चू कडू दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. पोलीस महासंचालक (प्रशिक्षण) कृष्ण प्रकाश यांच्यासह गृह विभाग आणि पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
भरती प्रक्रियेचे नियोजनबद्ध वेळापत्रक तयार करण्याच्या सूचना
पोलीस भरतीच्या प्रारंभिक टप्प्यांचे वेळापत्रक निश्चित करण्यासाठी आवश्यक धोरणात्मक उपाययोजना कराव्यात. तसेच शासनस्तरावर आवश्यक निर्णय व मान्यता घेऊन संपूर्ण भरती प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने राबवावी, असे निर्देश योगेश कदम यांनी दिले.
विविध स्पर्धा परीक्षा तसेच केंद्र शासनाच्या सुरक्षा दलांच्या भरती प्रक्रियेचे वेळापत्रक लक्षात घेऊन पोलीस भरतीतील लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणीचे नियोजन करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
हेही वाचा – मुंबईतील २५ हजार वंचित झोपडीधारकांना मोठा दिलासा; ‘अभय’ योजनेचा विस्तार करण्याचे आशिष शेलारांचे निर्देश
कागदपत्र पडताळणीपासून नियुक्तीपर्यंत प्रक्रिया सुलभ करणार
कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय तपासणी आणि नियुक्ती प्रक्रिया अधिक सुसूत्र करण्यासह विविध पोलीस युनिटमधील रिक्त पदांचे नियोजन करण्याबाबतही आढावा घेण्यात आला. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे निर्माण होणाऱ्या रिक्त जागांवर वेळेत भरती करण्याच्या दृष्टीनेही नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
प्रशिक्षण केंद्रांच्या क्षमतेचाही आढावा
राज्यातील १० पोलीस प्रशिक्षण केंद्रांची क्षमता, प्रशिक्षणार्थींसाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि अधोसंरचना बळकटीकरणाबाबत बैठकीत चर्चा झाली. महिला पोलीस भरतीला मिळालेला प्रतिसाद, तसेच एसआरपीएफ, कारागृह विभाग, होमगार्ड आरक्षण, अनुकंपा नियुक्त्या आणि इतर संवर्गांतील भरती प्रक्रियेच्या समन्वयाचाही आढावा घेण्यात आला.
ऑनलाइन अर्ज आणि निवड प्रक्रियेत पारदर्शकतेवर भर
भरती प्रक्रियेतील तांत्रिक बाबी, ऑनलाइन अर्ज प्रणाली, निवड प्रक्रिया, पारदर्शकता, गुणवत्ता आणि प्रशासकीय कार्यक्षमता अधिक बळकट करण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा अभ्यास करावा, असे निर्देश राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले.
वार्षिक भरती वेळापत्रकामुळे उमेदवारांना भरती प्रक्रियेची माहिती आधीच उपलब्ध होऊन अभ्यास आणि शारीरिक चाचणीच्या तयारीसाठी नियोजन करता येणार आहे. त्यामुळे भविष्यात पोलीस भरती प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित आणि कालबद्ध करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.




