मुंबईतील २५ हजार वंचित झोपडीधारकांना मोठा दिलासा; ‘अभय’ योजनेचा विस्तार करण्याचे आशिष शेलारांचे निर्देश
परिशिष्ट-२ नंतर झोपडी हस्तांतरणामुळे लाभापासून वंचित नागरिकांचाही समावेश; रखडलेल्या पुनर्वसन योजनांना मिळणार गती

मुंबई : परिशिष्ट-२ नंतर अपात्र झोपडीचे हस्तांतरण झाल्यामुळे ‘अभय’ योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या २००० पूर्वीच्या तसेच २००० ते २०११ दरम्यानच्या झोपडीधारकांनाही या योजनेचा लाभ देण्यासाठी योजनेचा विस्तार करण्याचे निर्देश पालकमंत्री, मुंबई उपनगर तथा इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.
२०११ पूर्वी परिशिष्ट-२ तयार झालेल्या मात्र रखडलेल्या पुनर्वसन योजनांमधील पात्र झोपडीधारकांना सध्या ‘अभय’ योजनेचा लाभ मिळत आहे. मात्र, परिशिष्ट-२ मध्ये अपात्र ठरलेले आणि त्यानंतरच्या नियमांनुसार पात्र ठरू शकणारे झोपडीधारक तसेच परिशिष्ट-२ नंतर झोपडीचे हस्तांतरण झाल्यामुळे योजनेपासून वंचित राहिलेले नागरिक अद्याप या लाभापासून दूर आहेत.
२००० ते २०११ दरम्यानच्या झोपडीधारकांचाही समावेश
या पार्श्वभूमीवर २००० ते २०११ या कालावधीतील सशुल्क पात्र-अपात्र झोपडीधारकांचाही ‘अभय’ योजनेत समावेश करून त्यांना लाभ देण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.
या निर्णयामुळे मुंबईतील सुमारे २५ हजार वंचित झोपडीधारकांना ‘अभय’ योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे दीर्घकाळ रखडलेल्या पुनर्वसन योजनांना गती मिळण्यास मदत होणार असून, झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सरकार सकारात्मक; अन्याय होऊ देणार नाही : मंत्री डॉ. अशोक वुईके
पात्रता आणि हस्तांतरणाच्या बाबींचा नियमानुसार विचार
झोपडीधारकांना पुनर्वसनाचा लाभ देताना पात्रता, हस्तांतरण आणि परिशिष्ट-२शी संबंधित प्रलंबित बाबींचा नियमानुसार विचार करावा, अशा सूचनाही आशिष शेलार यांनी दिल्या.
योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करून पुढील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो झोपडीधारकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.




