Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेत मोठा बदल; ‘प्रगती’ प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी

४,२५० कोटींच्या प्रकल्पातून आरोग्य सेवांचे आधुनिकीकरण; पाच जिल्ह्यांत १,६०० खाटांची वाढ, डिजिटल आरोग्यसेवांनाही मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण, सुलभ आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्राथमिक आरोग्यसेवेची नव्याने उभारणी, प्रगत प्रशासन आणि सुलभ तंत्रज्ञानाचा समन्वय साधणाऱ्या ‘प्रगती’ या राज्यस्तरीय सार्वजनिक आरोग्य सुधारणा प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील आरोग्य सेवांचा विस्तार, गुणवत्तावाढ आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांना गती मिळणार आहे.

२०२६ ते २०३१ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ४,२५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये आशियाई विकास बँकेकडून ७० टक्के म्हणजे सुमारे २,९७५ कोटी रुपये कर्ज, तर ३० टक्के म्हणजे १,२७५ कोटी रुपये राज्य शासनाचा हिस्सा राहणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी ही माहिती दिली.

पाच जिल्ह्यांत १,६०० खाटांची वाढ

‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत पाच जिल्ह्यांतील रुग्णालयांची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार आहे. कोल्हापूर आणि नांदेड येथे प्रत्येकी ५०० खाटांची नवीन जिल्हा रुग्णालये, पुणे येथे २०० खाटांचे संदर्भसेवा रुग्णालय, तर लातूर आणि नागपूर येथील प्रत्येकी २०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे.

या माध्यमातून एकूण १,६०० खाटांची क्षमता वाढणार असून, त्यासाठी अंदाजे १,५०० कोटी रुपयांचा भांडवली खर्च अपेक्षित आहे. जिल्हास्तरावरच निदान, उपचार आणि संदर्भ सेवा उपलब्ध झाल्याने तृतीय स्तरावरील रुग्णालयांवरील अनावश्यक भार कमी होण्यास मदत होणार आहे.

असंसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंधावर विशेष भर

‘प्रगती’ प्रकल्पात असंसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंध, तपासणी, निदान आणि उपचाराला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, दीर्घकालीन मूत्रपिंडविकार, फुफ्फुसविकार, पक्षाघात, मानसिक आरोग्य, मधुमेहामुळे होणारे डोळ्यांचे विकार, यकृतातील चरबी वाढणे तसेच वेदनाशामक आणि जीवनाच्या अखेरच्या टप्प्यातील सेवांची क्षमता वाढविण्यात येणार आहे.

आरोग्य तपासणी, समुपदेशन, जनजागृती, आरोग्यविषयक सकारात्मक वर्तनबदल आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौशल्यवर्धन यावरही भर दिला जाणार आहे.

हेही वाचा –  पोलीस भरतीसाठी आता वार्षिक वेळापत्रक; भरती प्रक्रिया पारदर्शक आणि कालबद्ध करण्याचे योगेश कदम यांचे निर्देश

कर्करोगाचे वेळेत निदान करण्यासाठी सुविधा बळकट

स्तन, गर्भाशयमुख आणि तोंडाच्या कर्करोगाच्या तपासणी व निदान सुविधा अधिक सक्षम करण्यात येणार आहेत. कर्करोगाचे वेळेत निदान आणि उपचारासाठी आवश्यक तंत्रज्ञान तसेच मनुष्यबळाला बळकटी दिली जाणार आहे.

यामुळे कर्करोगाच्या रुग्णांना वेळेत निदान, उपचार आणि त्यानंतरचा पाठपुरावा मिळण्यास मदत होणार आहे.

डिजिटल आरोग्यसेवांनाही मिळणार गती

‘महाराष्ट्र आरोग्य तंत्रज्ञान अभियान’च्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रातील डिजिटल परिवर्तनाला गती देण्यात येणार आहे. डिजिटल आरोग्य नोंदी, आरोग्य माहिती प्रणालींचे एकत्रीकरण, दूरस्थ वैद्यकीय सल्ला आणि विविध तंत्रज्ञानाधारित सेवांचा विस्तार करण्यात येणार आहे.

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्य सेवा नागरिकांच्या अधिक जवळ पोहोचविणे, विविध स्तरांवरील आरोग्य सेवांमध्ये समन्वय वाढविणे आणि रुग्णांना सातत्यपूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, हा या प्रकल्पाचा महत्त्वाचा उद्देश आहे.

सार्वजनिक आरोग्य यंत्रणेची कार्यक्षमता वाढणार

‘प्रगती’ प्रकल्पामुळे राज्यातील आरोग्य सेवेचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार असून, नागरिकांना अधिक सुलभ, गुणवत्तापूर्ण आणि एकात्मिक आरोग्य सेवा उपलब्ध होणार असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

असंसर्गजन्य आजार आणि कर्करोगाचे वेळेत निदान, उपचार व पाठपुरावा, मानसिक आरोग्य, जीवनाच्या अखेरच्या टप्प्यातील सेवा, डिजिटल आरोग्य आणि रुग्णांच्या सातत्यपूर्ण उपचार व्यवस्थेला या प्रकल्पातून बळ मिळणार आहे.

आरोग्य सेवांचे एकत्रीकरण, तंत्रज्ञानाचा वापर आणि व्यवस्थापनातील सुधारणा यामुळे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेची कार्यक्षमता वाढणार आहे. तसेच नागरिकांचा आरोग्यावरील स्वखर्च कमी करण्यास आणि ‘सर्वांसाठी आरोग्यसेवा’ या उद्दिष्टाला चालना मिळणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button