MPSC पेपरफुटीविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश; सुप्रिया सुळेंची सरकारकडे मोठी मागणी
‘विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी जबाबदार व्यक्ती पाठवा’; पेपरफुटी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची मागणी

पुणे : MPSC पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, पुण्यात विद्यार्थ्यांनी पेपरफुटीविरोधात आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चामध्ये विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय होती. MPSC परीक्षेतील पेपरफुटीला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.
या आक्रोश मोर्चात खासदार सुप्रिया सुळे यांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर माध्यमांशी बोलताना सुळे यांनी सरकारवर निशाणा साधत विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी सरकारने जबाबदार व्यक्ती पाठवावी, अशी मागणी केली.
‘विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी जबाबदार व्यक्ती पाठवा’
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘विद्यार्थी चर्चेला तयार आहेत. परंतु त्यांच्याशी चर्चा करायला कोण येत आहे? हे दुर्दैवी आहे. मुलांनी शिक्षण घ्यावे, नोकरी करावी, चांगले शिक्षण घेऊन देशाची सेवा करावी. मात्र, दुर्दैवाने विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे. हे सरकारचे अपयश आहे. मी विनम्रपणे सांगत आहे की, एका जबाबदार व्यक्तीला पाठवा आणि विद्यार्थ्यांशी चर्चा करा.’
हेही वाचा – गणेशभक्तांसाठी बेस्टच्या जादा बसगाड्या रात्रभर धावणार; मेट्रो-3 सेवाही मध्यरात्रीपर्यंत
पेपरफुटी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा
पेपरफुटीच्या घटनांवर बोलताना सुळे यांनी तंत्रज्ञानाच्या वापरावरही प्रश्न उपस्थित केला. ‘तंत्रज्ञानाचा उपयोग का होत नाही, माहीत नाही. जगभर अशा अनेक परीक्षा होतात. भारतातही अनेक परीक्षा घेतल्या जातात. तिथे पेपर फुटले नाहीत. मग याच परीक्षेत पेपर कसे फुटतात? एवढे एआय आणि तंत्रज्ञान उपलब्ध आहे, त्यामुळे काहीतरी उपाय नक्की करता येऊ शकतो. पेपरफुटी थांबवता येत नाही, यावर माझा विश्वास नाही,’ असे त्या म्हणाल्या.
‘विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून मार्ग काढा’
सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याचे आवाहन केले. ‘महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा विनंती करते की, कोणीतरी जबाबदार व्यक्ती पाठवा. विद्यार्थ्यांसोबत चर्चा करा. सगळे मिळून मार्ग काढू. हे सर्व आपलीच मुले आहेत. त्यांच्यासाठी मार्ग काढू,’ असे त्यांनी सांगितले.
मोर्चाला झालेली गर्दी पाहता विद्यार्थ्यांचा आक्रोश स्पष्टपणे दिसून येत आहे, असेही सुळे म्हणाल्या. MPSC अध्यक्ष आणि सचिव यांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थी वारंवार करत आहेत. त्यामुळे या मागणीवरही सरकारने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.




