गणेशभक्तांसाठी बेस्टच्या जादा बसगाड्या रात्रभर धावणार; मेट्रो-3 सेवाही मध्यरात्रीपर्यंत
१४ ते २५ सप्टेंबरदरम्यान १० मार्गांवर २६ अतिरिक्त बस; रात्री साडेदहा ते सकाळी सहापर्यंत विशेष सेवा

मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी बेस्ट उपक्रमाच्या वाहतूक विभागाने विशेष नियोजन केले आहे. गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील प्रमुख गणेश मंडळे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणाऱ्या भाविकांसाठी बेस्टच्या जादा बसगाड्या रात्रभर धावणार आहेत.
लालबाग, परळ, गिरगाव, खेतवाडी यांसह दक्षिण मुंबईतील प्रमुख गर्दीच्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान १० बसमार्गांवर २६ जादा बसगाड्यांची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही विशेष बससेवा रात्री साडेदहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत गणेशदर्शन घेणाऱ्या भाविकांसह विसर्जनासाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या आगारांमधून धावणार जादा बस
ओशिवरा, शिवाजीनगर, देवनार, बॅकबे, मुंबई सेंट्रल, वरळी, सांताक्रुझ, वडाळा आणि काळा किल्ला या आगारांमार्फत विशेष बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. दक्षिण मुंबईतील गर्दीच्या भागांसोबतच पश्चिम उपनगरातील गणेशभक्तांसाठीही अतिरिक्त सार्वजनिक वाहतूक उपलब्ध राहणार आहे.
ओशिवरा आणि सांताक्रुझपर्यंत जादा बसगाड्या धावणार असल्याने रात्रीच्या वेळी गणेशभक्तांना सुरक्षित आणि सोयीस्कर सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय मिळणार आहे.
हेही वाचा – उत्तर प्रदेशसह ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा बिगुल लवकरच; फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये मतदानाची शक्यता
मेट्रो-3 सेवाही मध्यरात्रीपर्यंत
बेस्ट बससेवेबरोबरच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मेट्रो-3 अर्थात अॅक्वा लाइनची सेवा १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या कफ परेड आणि आरे जेव्हीएलआर या दोन्ही टर्मिनल स्थानकांवरून शेवटची मेट्रो रात्री १०.३० वाजता सुटते. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात सेवा मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार असल्याने रात्री उशिरापर्यंत गणपती बाप्पाचे दर्शन घेणाऱ्या भाविकांना परतीच्या प्रवासासाठी मेट्रोचाही पर्याय उपलब्ध होणार आहे.
गणेशोत्सवातील वाढती गर्दी लक्षात घेता बेस्टच्या अतिरिक्त बससेवा आणि मेट्रो-3च्या वाढीव वेळेमुळे मुंबईतील गणेशभक्तांना रात्रीच्या प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीची सुविधा अधिक सुलभ होणार आहे.





