Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मनमाड-इंदूर, धुळे-नरडाणा रेल्वेमार्गांना गती; शेतकरी हित जपत कामे कालबद्ध पूर्ण करा : मंत्री जयकुमार रावल

भूसंपादनासह प्रलंबित बाबी तातडीने निकाली काढण्याचे निर्देश; रेल्वे प्रकल्पांमुळे धुळ्याला बाजारपेठ, उद्योग आणि रोजगाराच्या नव्या संधी मिळणार

Dhule Railway Projects : मनमाड-इंदूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आणि धुळे (बोरविहीर)-नरडाणा रेल्वेमार्ग हे धुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारे महत्त्वपूर्ण प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमुळे धुळे महाराष्ट्रासह मध्य भारत आणि देशातील विविध भागांशी अधिक सक्षमपणे जोडले जाणार आहे. त्यामुळे शेतमालाला मोठ्या बाजारपेठा, उद्योगांना गतिमान वाहतूक, युवकांना रोजगाराच्या संधी आणि नागरिकांना सुलभ प्रवास उपलब्ध होणार आहे. विकासाची ही वाट पुढे नेताना जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांचे हित संवेदनशीलतेने जपत भूसंपादनासह सर्व प्रलंबित बाबी कालबद्ध पद्धतीने मार्गी लावून प्रकल्पांना गती द्यावी, असे निर्देश पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

पालकमंत्री रावल यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही रेल्वे प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. बैठकीला जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, अपर जिल्हाधिकारी संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी, रेल्वेचे उपमुख्य अभियंता (बांधकाम) किशोर सिंह, वरिष्ठ विभाग अभियंता समीर कुमार, पीएमएसचे टीम लीडर कौशलेंद्र कुमार यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत भूसंपादन, संयुक्त मोजणी, शासकीय व वनजमीन, रेल्वेस्थानके, पूल, बांधकामाची प्रगती तसेच अंमलबजावणीतील अडचणींचा आढावा घेण्यात आला. रेल्वे, महसूल, वन आणि संबंधित विभागांनी समन्वयाने प्रत्येक प्रलंबित बाबीची जबाबदारी व कालमर्यादा निश्चित करावी. एका विभागाच्या कार्यवाहीअभावी पुढील काम रखडणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे रावल यांनी स्पष्ट केले.

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाची ३०९.४३ किमी लांबी

मनमाड ते नवीन धुळे आणि नरडाणा ते डॉ. आंबेडकर नगर (महू) या नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गाची एकूण लांबी ३०९.४३ किलोमीटर असून प्रकल्पाचा अंदाजित खर्च १६ हजार ३२०.५३ कोटी रुपये आहे. महाराष्ट्रात १६ आणि मध्य प्रदेशात १८ अशी एकूण ३४ रेल्वेस्थानके या मार्गावर प्रस्तावित आहेत.

हा केवळ रेल्वेमार्ग नसून धुळे जिल्ह्याच्या आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक विकासासाठी महत्त्वाचा दुवा ठरणार असल्याचे रावल यांनी सांगितले.

हेही वाचा –  पाकिस्तानला ७ विकेट्सने धूळ चारत भारताचा दणदणीत विजय; हरमनप्रीतचा विजयी षटकार

धुळ्याच्या कनेक्टिव्हिटीला मिळणार नवे परिमाण

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गामुळे धुळे मनमाडमार्गे देशाच्या विस्तृत रेल्वे जाळ्याशी, तर नरडाणा-शिरपूरमार्गे डॉ. आंबेडकर नगर (महू), इंदूर आणि मध्य भारताशी जोडले जाणार आहे. त्यामुळे प्रवासासोबतच मालवाहतुकीला वेग मिळणार असून देशातील विविध बाजारपेठांपर्यंत पोहोचणे सुलभ होईल.

धुळे व नरडाणा परिसरातील उद्योग, कृषी प्रक्रिया प्रकल्प, गोदामे, साठवणूक व वितरण केंद्रे तसेच लॉजिस्टिक सुविधांच्या विकासाला चालना मिळून नवीन गुंतवणूक आणि स्थानिक युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होईल.

धुळे हा कृषिप्रधान जिल्हा असल्याने रेल्वे कनेक्टिव्हिटीचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. कृषी उत्पादनांना मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यासाठी सक्षम वाहतूक व्यवस्था उपलब्ध होईल. कृषी प्रक्रिया, पॅकेजिंग, साठवणूक आणि पुरवठा साखळीच्या विस्तारातून शेतमालाच्या मूल्यवर्धनालाही चालना मिळेल. मध्य भारतातील पर्यटन आणि धार्मिक स्थळांशी संपर्क वाढल्याने पर्यटन क्षेत्रालाही नव्या संधी उपलब्ध होतील, असे रावल यांनी सांगितले.

विकासासोबत शेतकऱ्यांचे हित जपण्याचे निर्देश

मनमाड-इंदूर प्रकल्पासाठी एकूण १ हजार ९३७.९९१ हेक्टर जमीन आवश्यक असून हा रेल्वेमार्ग सहा जिल्ह्यांतील १४३ गावांतून जाणार आहे. धुळे जिल्ह्यात धुळे तालुक्यातील ९, शिंदखेडा तालुक्यातील ८ आणि शिरपूर तालुक्यातील १६ अशा एकूण ३३ गावांचा समावेश आहे.

धुळे जिल्ह्यात ४५३.८४२ हेक्टर जमीन आवश्यक आहे. त्यापैकी ३०७.६४ हेक्टर खासगी, १२८.६६२ हेक्टर वन आणि १७.५४ हेक्टर शासकीय जमीन आहे. गावनिहाय प्रलंबित बाबींची नोंद घेऊन संयुक्त मोजणी, भूसंपादन आणि जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया गतिमान करण्याच्या सूचना रावल यांनी दिल्या.

विकासासाठी जमीन देणारा शेतकरी हा प्रकल्पाचा महत्त्वाचा भागीदार आहे. त्यामुळे जमीन, झाडे, विहिरी, घरे किंवा अन्य मालमत्तेच्या मोबदल्याशी संबंधित रास्त प्रकरणांकडे दुर्लक्ष होऊ नये. प्रत्येक प्रश्नाकडे संबंधित कुटुंबाच्या उपजीविकेशी जोडलेला विषय म्हणून पाहून शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधावा. भूसंपादन आणि मोबदल्याची प्रक्रिया पारदर्शक ठेवत प्रकल्पाची गती आणि जमीनधारकांचे हित यांचा समतोल राखावा, असे रावल यांनी स्पष्ट केले.

धुळे-नरडाणा रेल्वेमार्गाची भौतिक प्रगती ४३ टक्के

धुळे (बोरविहीर)-नरडाणा रेल्वेमार्गाची भौतिक प्रगती ४३ टक्के, तर आर्थिक प्रगती ७९.३६ टक्के झाली आहे. प्रकल्पाचा सुधारित खर्च १ हजार २३७.४६ कोटी रुपये असून मार्च २०२८ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

या मार्गावर बोरविहीर आणि नरडाणा या विद्यमान स्थानकांसह नवीन धुळे, निमखेडी, कापडणे आणि सोनगीर अशी चार नवीन स्थानके प्रस्तावित आहेत. प्रकल्पात एक महत्त्वाचा पूल, २४ मोठे पूल, ३९ लहान पूल, २ रोड ओव्हर ब्रिज आणि ४९ रोड अंडर ब्रिज/लो हाइट सब-वेचा समावेश आहे.

२४ मोठ्या पुलांपैकी ९ पूर्ण झाले असून १२ पुलांचे काम सुरू आहे. ३९ लहान पुलांपैकी २४ पूर्ण झाले असून ५ कामे प्रगतिपथावर आहेत. ४९ रोड अंडर ब्रिजपैकी २४ पूर्ण झाले असून ९ कामे सुरू आहेत. पाच स्थानक इमारतींपैकी तीन इमारतींची कामे प्रगतिपथावर असून ८.६४ किलोमीटर ट्रॅक लिंकिंग पूर्ण झाले आहे.

जमीन ताबा आणि न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देश

पिंप्री, कुंडाणे, नायळोद, धमाणे, कापडणे, दापुरा आणि दापुरी परिसरातील जमीन ताबा, मोबदला, झाडे, विहिरी व अन्य मालमत्तेचे मूल्यांकन तसेच न्यायालयीन प्रकरणांशी संबंधित अडचणी तपासून निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले.

रेल्वेच्या नोंदीनुसार १४.१५ हेक्टर, तर उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नोंदीनुसार १२.६९ हेक्टर जमीन ताब्यात मिळणे प्रलंबित आहे. त्यामुळे १.४६ हेक्टरची तफावत संयुक्तपणे पडताळून अंतिम आकडेवारी निश्चित करण्यास सांगण्यात आले.

मनमाड-इंदूर प्रकल्पातील २६ बोगद्यांसह भूसंपादन, वनविषयक मंजुरी आणि तांत्रिक बाबींची कार्यवाहीही समांतरपणे पुढे न्यावी, असे रावल यांनी सांगितले.

दोन्ही रेल्वे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर धुळे जिल्ह्याला देशाच्या विविध भागांशी अधिक सक्षम रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. शेतमालाला नव्या बाजारपेठा, उद्योगांना वाहतुकीची गती, युवकांना रोजगार आणि नागरिकांना सुलभ प्रवास उपलब्ध होणार असल्याने प्रकल्पांचा लाभ सर्व घटकांपर्यंत पोहोचवताना शेतकरी आणि नागरिकांचे हित केंद्रस्थानी ठेवावे, असे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button