Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“विद्यार्थ्यांना अंतर्मुख होऊन विचार करण्यास प्रवृत्त करणारे शिक्षण द्या”; चंद्रकांत पाटलांचा शिक्षकांना संदेश

डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराची १४ वर्षांनंतर पुन्हा सुरुवात; राज्यातील ४२ शिक्षकांचा सन्मान

पुणे : विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी किंवा बाह्य ज्ञान देण्याऐवजी त्यांना अंतर्मुख होऊन विचार करण्यास प्रवृत्त करणारे शिक्षण दिले पाहिजे. महाराष्ट्राच्या परंपरा, संस्कृती आणि जीवनमूल्यांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करून देतानाच विधायक प्रथा-परंपरांमागील विज्ञानही नव्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे, असे मत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी व्यक्त केले.

पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने आयोजित डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या पुरस्काराची १४ वर्षांची खंडित परंपरा पुन्हा सुरू करण्यात आली असून राज्यातील ४२ शिक्षकांची यासाठी निवड करण्यात आली आहे.

शिक्षणासोबत जीवनमूल्यांचे शिक्षण आवश्यक

“मोठ्या व्यक्तिमत्त्वांची माहिती आजच्या पिढीला नसणे हे दुर्दैव आहे. कर्तृत्वासोबत नम्रपणाही वाढवला पाहिजे. पुढील पिढीत चांगले संस्कार झिरपण्यासाठी शिक्षणासोबत जीवनमूल्यांचे शिक्षणही आवश्यक आहे,” असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि जीवनमूल्यांचा परिचय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून करून देण्याची गरज आहे. गणेशोत्सव केवळ डीजेपुरता मर्यादित न राहता त्यामागील सांस्कृतिक आणि धार्मिक पैलू नव्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत, असेही त्यांनी नमूद केले.

आज विद्यार्थ्यांच्या हातात ज्ञानाचे मोठे भांडार उपलब्ध असले तरी शिक्षकांचे महत्त्व कमी झालेले नाही. शिक्षकांची भूमिका केवळ वर्गातील अध्यापनापुरती मर्यादित नसून ते सामाजिक नेतृत्वही करतात. बदलत्या काळानुसार शिक्षकांवर नव्या जबाबदाऱ्या आल्या आहेत, असे पाटील म्हणाले.

हेही वाचा –  मनमाड-इंदूर, धुळे-नरडाणा रेल्वेमार्गांना गती; शेतकरी हित जपत कामे कालबद्ध पूर्ण करा : मंत्री जयकुमार रावल

विद्यार्थ्यांच्या मनातील असुरक्षितता समजून घ्या

तरुण पिढीमध्ये भविष्यासंदर्भात असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याने त्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या मनात नेमके काय सुरू आहे, हे शिक्षकांनी समजून घेऊन त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी सांगितले.

डॉ. जे. पी. नाईक यांच्या नावाने पुरस्कार सुरू

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षणतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. जे. पी. नाईक यांचे शिक्षण, संशोधन, शिक्षक प्रशिक्षण, ग्रामविकास आणि आरोग्य क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या नावाने शिक्षक पुरस्कार सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. आंतरभारती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सागर देशपांडे यांनी केलेली ही मागणी मान्य करून पुरस्कार सुरू करताना आनंद होत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी सांगितले की, २०१२ मध्ये खंडित झालेली शिक्षक पुरस्काराची परंपरा तब्बल १४ वर्षांनंतर पुन्हा सुरू झाली आहे. गुणात्मक शिक्षण, शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांचा या पुरस्काराच्या माध्यमातून सन्मान करण्यात येत आहे.

पारदर्शक प्रक्रियेतून ४२ शिक्षकांची निवड

पुरस्कारासाठी शिक्षकांची निवड करताना विविध पातळ्यांवर छाननी करण्यात आली. राज्यस्तरीय समितीत मान्यवर शिक्षकांचा समावेश होता. कठोर आणि पारदर्शक प्रक्रियेतून राज्यातील ४२ शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे डॉ. देवळाणकर यांनी स्पष्ट केले.

या वेळी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू पराग काळकर, सचिव प्रफुल्ल पवार, डॉ. किशोर इंगळे यांच्यासह राज्यातील विविध महाविद्यालयांतील पुरस्कारप्राप्त प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यापीठाचे कर्मचारी उपस्थित होते.

पुरस्कारामुळे केवळ शिक्षकांचाच नव्हे, तर त्यांच्या परिवाराचाही सन्मान होत असल्याची भावना डॉ. सुरेश गोसावी यांनी व्यक्त केली. पुरस्कारप्राप्त डॉ. देविदास वायदंडे आणि अंजली जोशी यांनीही आपल्या भावना व्यक्त करत कृतज्ञता व्यक्त केली.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही पुरस्कार

शैक्षणिक व्यवस्थेत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही महत्त्वाचा सहभाग असतो. त्यामुळे पुढील वर्षापासून आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

तसेच नवीन प्रयोग करणाऱ्या व्यक्तींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्कार देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्जनशील आणि संशोधक विद्यार्थ्यांचा सन्मान होणे महत्त्वाचे असल्याचे पुरस्कारप्राप्त प्राध्यापकांनी सांगितले. शिक्षक हे सामाजिक नेतृत्व करणारे घटक असून पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याला प्रेरणा मिळण्यासोबतच समाजात शैक्षणिक आणि सामाजिक जाणीव निर्माण होण्यास मदत होईल, अशी भावना अंजली जोशी यांनी व्यक्त केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button