JNU प्राध्यापकावर १० विद्यार्थिनींचे लैंगिक शोषणाचे आरोप; अंतर्गत चौकशी समितीकडून तपास सुरू

नवी दिल्ली | जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. विद्यापीठातील एका प्राध्यापकावर तब्बल १० विद्यार्थिनींनी लैंगिक छळवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. या तक्रारींची दखल घेत विद्यापीठाच्या अंतर्गत तक्रार समितीने (ICC) संबंधित प्राध्यापकाविरुद्ध अधिकृत चौकशी सुरू केली आहे.
साधारण महिन्याभरापूर्वी या प्रकरणात पहिली तक्रार नोंदवण्यात आली होती. प्राध्यापकाने कॅम्पसमधील आपल्या निवासस्थानी विद्यार्थ्यांसाठी स्नेहसंमेलन आयोजित केले होते. या दरम्यान प्राध्यापकाने अश्लील स्पर्श करून अनुचित वर्तन केल्याचा आरोप पीडित विद्यार्थिनींनी केला आहे. याव्यतिरिक्त, नियमित लेक्चर्सदरम्यान वर्गातही हा प्राध्यापक वारंवार अश्लील आणि द्विअर्थी शेरेबाजी करत असल्याचा दावा विद्यार्थिनींनी केला आहे.
हेही वाचा
बिजलीनगर महावितरण सबस्टेशनमध्ये भीषण स्फोट; चिंचवडसह अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित
माजी विद्यार्थ्यांचा पाठिंबा, प्रशासनाचे मौन
पहिली तक्रार दाखल झाल्यानंतर विद्यापीठातील माजी विद्यार्थ्यांनीही पुढे येत पीडित विद्यार्थिनींना पाठिंबा दर्शवला असून, संबंधित प्राध्यापकाकडून भूतकाळातही असे प्रकार घडल्याचे सांगितले आहे. सध्या अंतर्गत तक्रार समिती या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. मात्र, या गंभीर घटनेवर जेएनयू प्रशासन आणि कुलगुरू कार्यालयाने अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नसून विद्यार्थी संघटनेनेही यावर थेट वक्तव्य करणे टाळले आहे.





