बिजलीनगर महावितरण सबस्टेशनमध्ये भीषण स्फोट; चिंचवडसह अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित

पिंपरी-चिंचवड | चिंचवड येथील बिजलीनगर परिसरातील महावितरणच्या मुख्य वीज उपकेंद्रात (सबस्टेशन) भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहरासह आसपासच्या मोठ्या परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षेचा खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीजपुरवठा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आला आहे.
हा स्फोट नेमका कोणत्या तांत्रिक बिघाडामुळे अथवा शॉर्टसर्किटमुळे झाला, याचे कारण अद्याप अधिकृतरीत्या समोर आलेले नाही. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आणि तांत्रिक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
हेही वाचा
हिंजवडीतील सुविधांच्या दुरवस्थेविरोधात हजारो आयटीयन्स रस्त्यावर
शहरातील ‘या’ भागांना बसला मोठा फटका
सबस्टेशनमधील बिघाडामुळे आणि खबरदारीचा उपाय म्हणून केलेल्या वीज कपातीमुळे शहरातील प्रमुख भागांतील वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. यामध्ये चिंचवड, पिंपरी, थेरगाव, काळेवाडी, रहाटणी आणि पिंपळे सौदागर या दाट लोकवस्तीच्या परिसरांचा समावेश आहे.
अचानक वीज गुल झाल्याने लाखो नागरिक, व्यापारी आणि लघुउद्योजकांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. वीजपुरवठा नेमका कधीपर्यंत पूर्ववत होईल, याबाबत महावितरणकडून अद्याप कोणतीही अधिकृत वेळ निश्चित करण्यात आलेली नसून, तांत्रिक दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरच वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत केला जाईल, असे सांगण्यात आले आहे.





