Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

“सांस्कृतिक देवाणघेवाणीतूनच शांततामय आणि समृद्ध जगाची निर्मिती शक्य”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम २०२६’च्या दुसऱ्या पर्वाचे उद्घाटन; ब्रिक्स देशांमध्ये सांस्कृतिक संवाद आणि परस्पर सहकार्य वाढविण्यावर भर

मुंबई : जगातील विविध देशांच्या संस्कृती, परंपरा, विचारसरणी आणि जीवनपद्धती वेगवेगळ्या असल्या, तरी मानवतेला जोडणारी काही सार्वत्रिक मूल्ये समान आहेत. या मूल्यांचा शोध घेत सांस्कृतिक देवाणघेवाण, परस्पर सन्मान आणि संवादाची व्याप्ती वाढविणे ही आजची गरज आहे. केवळ आर्थिक सहकार्य नव्हे, तर मानवी मूल्ये, सांस्कृतिक वारसा आणि परस्पर संवादातूनच अधिक समतोल, शांततामय आणि समृद्ध जगाची निर्मिती शक्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम २०२६’ (GIF) च्या दुसऱ्या पर्वाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी मुंबईतील ब्राझीलचे महावाणिज्यदूत जोसे मौरो फोनेस्का कोस्टा कौटो, रशियाचे महावाणिज्यदूत इव्हान फेतिसोव्ह, चीनचे महावाणिज्यदूत किन ती, दक्षिण आफ्रिकेचे महावाणिज्यदूत गेडियन लाबाने यांच्यासह भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांतील राजनैतिक प्रतिनिधी, उद्योगपती, अभ्यासक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी भगवान श्रीकृष्णांच्या सर्वसमावेशकता, धर्मनिष्ठा आणि सत्याच्या विजयाच्या संदेशाचा उल्लेख केला.

संवादातून समान मूल्यांचा शोध आवश्यक

मुख्यमंत्री म्हणाले की, सध्याच्या काळात जग अनेक स्तरांवर विखुरलेले असून जागतिक व्यवस्था विविध अर्थांनी असंतुलित झाल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत विविध देशांनी एकत्र येण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधींचा शोध घेण्याची हीच योग्य वेळ आहे. संस्कृती, मते आणि विचारधारा भिन्न असल्या तरी संवादाच्या माध्यमातून समान मूल्यांवर आधारित परस्पर समज वाढविणे शक्य आहे.

केवळ आर्थिक संबंध आणि व्यापाराच्या माध्यमातून जग अधिक चांगले होऊ शकत नाही. त्यासाठी मानवी मूल्यांवर आधारित संवाद, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि परस्परांच्या अनुभवांतून शिकण्याची प्रक्रिया आवश्यक आहे. विविध देशांतील नागरिक, राजकीय नेते, राजनैतिक प्रतिनिधी, विचारवंत तसेच उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रातील नेतृत्वाने अशा व्यासपीठांवर एकत्र येऊन विचारांचे आदान-प्रदान करणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  ‘देवरे दोषी आढळल्यास कारवाई होईल”; पेपरफुटीप्रकरणी मंत्री नरहरी झिरवाळांचे स्पष्टीकरण

‘वसुधैव कुटुंबकम्’ हा भारतीय संस्कृतीचा आधार

भारत हा जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक असून भारतीय संस्कृतीच्या मूलभूत विचारांचा पाया ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेत आहे. संपूर्ण विश्व एक असून संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे, ही भारतीय जीवनदृष्टी आहे. भारताने आपल्या इतिहासात केवळ वस्तू आणि व्यापाराचा प्रसार केला नाही, तर विचार, ज्ञान आणि जीवनमूल्यांचाही जगभर प्रसार केला आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

भारताचा जागतिक व्यापारातील ऐतिहासिक सहभाग महत्त्वपूर्ण राहिला आहे. व्यापाराबरोबरच भारतीय विचारांचा आणि जीवनमूल्यांचा विविध देशांवर प्रभाव पडला आहे. बौद्ध धर्म हे याचे महत्त्वपूर्ण उदाहरण आहे. भारतातून अनेक शतकांपूर्वी जगाच्या विविध भागांत पोहोचलेल्या या विचारधारेने मोठा प्रभाव निर्माण केला. विशेष म्हणजे या विचारांचा प्रसार युद्ध, संघर्ष किंवा हिंसेच्या माध्यमातून नव्हे, तर विचार आणि मूल्यांच्या प्रभावातून झाल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रिक्स देशांमध्ये सांस्कृतिक भागीदारीला चालना

यावेळी संचालक जान्हवी पवार यांनी ग्लोबल इम्पॅक्ट फोरमच्या व्यापक उद्दिष्टांची माहिती दिली. सांस्कृतिक समानता आणि परस्पर सहकार्याच्या माध्यमातून ब्रिक्स राष्ट्रांमध्ये नव्या भागीदारीच्या संधी निर्माण करण्याबरोबरच जागतिक स्तरावर सकारात्मक आणि दीर्घकालीन परिणाम साध्य करण्यासाठी हा मंच महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

इतिहास आणि लोकजीवनाच्या समृद्ध परंपरेत संगीत, नृत्य, क्रीडा आणि उत्सव हे ओळख तसेच सांस्कृतिक अभिव्यक्तीची प्रभावी माध्यमे ठरले आहेत. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांच्या सांस्कृतिक परंपरांमधील साम्यस्थळे आणि दृढ भागीदारीचे दर्शन घडविणारे दृकश्राव्य सादरीकरण यावेळी उपस्थितांना दाखविण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रभावी आयोजनाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी जान्हवी पवार आणि एपी ग्लोबल इम्पॅक्ट फोरमचे अभिनंदन केले. यावेळी विविध देशांचे राजदूत, उद्योग क्षेत्रातील वरिष्ठ प्रतिनिधी, अभ्यासक, समुदायाचे प्रतिनिधी, राजकीय नेते, विचारवंत तसेच उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button