Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘देवरे दोषी आढळल्यास कारवाई होईल”; पेपरफुटीप्रकरणी मंत्री नरहरी झिरवाळांचे स्पष्टीकरण

“ते कुठे राहतात याची मला कल्पना असण्याची गरज नाही”; पेपरफुटीचा आणि आपल्या कार्यालयाचा संबंध नसल्याचा झिरवाळांचा दावा

मुंबई : माझ्या कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी (OSD) गणेश देवरे हे कुठे राहतात, याची मला कल्पना असण्याची गरज नाही. देवरे पेपरफुटीप्रकरणी दोषी आढळले, तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल. संबंधित परीक्षा राज्य लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जातात. त्यामुळे पेपरफुटीचा आणि माझ्या कार्यालयाचा कोणताही संबंध नाही, असा दावा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केला आहे.

पेपरफुटीप्रकरणी चर्चेत आलेले गणेश देवरे यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली बाजू मांडली. “मी आरोपीच्या घरी भाड्याने राहतो, याचा अर्थ मी पेपरफुटीप्रकरणी दोषी आहे असा होत नाही. या प्रकरणात माझी कोणतीही चौकशी झालेली नाही आणि मी कुठेही लपून राहिलेलो नाही. प्रसारमाध्यमांकडून माझी विनाकारण बदनामी केली जात आहे,” असा दावा देवरे यांनी केला.

याबाबत मंत्री झिरवाळ म्हणाले की, देवरे गेल्या वर्षभरापासून त्यांच्या कार्यालयात कार्यरत आहेत आणि त्यांचे काम चांगले आहे. मात्र, देवरे नेमके कुठे राहतात, याची आपल्याला कल्पना नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पेपरफुटीप्रकरणी एसआयटीकडून तपास

औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणाच्या तपासासाठी मुंबई गुन्हे शाखेने विशेष चौकशी पथक स्थापन केले आहे. मंगेश देसाई हे या पथकाचे प्रमुख आहेत. ज्या लॅपटॉपच्या माध्यमातून प्रश्नसंच परीक्षार्थींना पाठवण्यात आल्याचे तपासात समोर आले, तो लॅपटॉप आरोपींनी फोडून वाशी खाडीत फेकून दिल्याचे सांगण्यात आले होते. पोलिसांनी हा लॅपटॉप शोधून काढला आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सात आरोपींपैकी पाच जण नंदुरबारचे असून ते एकमेकांचे नातलग असल्याची माहिती आहे. पोलिसांच्या तपासानुसार, सध्या या पेपरफुटीची व्याप्ती नंदुरबारपुरतीच मर्यादित असल्याचे समोर येत आहे.

हेही वाचा –  “विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, कर्तव्यभावना आणि राष्ट्रभक्ती रुजवा”; शिक्षक दिनी दादा भुसेंचे आवाहन

विरोधकांकडून चौकशीची मागणी

शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांचीही पेपरफुटीप्रकरणी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मंत्री कार्यालयाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह

दरम्यान, झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयाच्या कारभारावरूनही विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला होता. त्यावेळी मंत्री कार्यालयातील लिपिक राजू ढेरंग याला लाच स्वीकारताना अटक करण्यात आली होती. त्यावेळी संबंधित कर्मचारी अन्न व नागरी पुरवठा विभागाचा असल्याचे सांगत झिरवाळ यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता.

या घटनेनंतरही कार्यालयातील कर्मचाऱ्यांची पडताळणी करण्यात आली नसल्याचा आरोप केला जात आहे. खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी वगळता दोन विशेष कार्य अधिकारी, दोन लिपिक आणि तीन शिपाई उसनवारी पद्धतीने झिरवाळ यांच्या कार्यालयात कार्यरत असल्याचे सांगण्यात येत आहे.

गणेश देवरे यांचे नाव पेपरफुटीप्रकरणी चर्चेत आल्यानंतर त्यांची मूळ विभागात पाठवणी केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा मंत्री कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मात्र, पेपरफुटीप्रकरणी देवरे दोषी आहेत की नाही, हे तपासातूनच स्पष्ट होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group