TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रुग्णालयात राडा; आमदार पुत्रासह शिंदे गटाच्या ११ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

बिलाच्या वादातून रिसेप्शनिस्टला मारहाण; पालघरच्या रिलीफ हॉस्पिटलमधील घटना सीसीटीव्हीत कैद

Palghar Crime News : महाराष्ट्रात रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील मारहाणीच्या घटना पुन्हा चर्चेत आल्या आहेत. पालघर येथील रिलीफ हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह आमदार पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिलाच्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघर येथील रिलीफ हॉस्पिटलमध्ये एका जखमी गोविंदाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्या वैद्यकीय बिलावरून रुग्णालय प्रशासन आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. चिडलेल्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयातील रिसेप्शनिस्टला मारहाण केल्याचा आरोप आहे.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज रुग्णालयातील कॅमेऱ्यात कैद झाले असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा –  “सांस्कृतिक देवाणघेवाणीतूनच शांततामय आणि समृद्ध जगाची निर्मिती शक्य”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आमदार पुत्रासह ११ जणांवर गुन्हा

या घटनेनंतर पालघर पोलिसांनी कारवाई करत शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे आणि आमदार राजेंद्र गावित यांचे पुत्र रोहित गावित यांच्यासह एकूण ११ जणांविरोधात रात्री उशिरा पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

यापूर्वी ६ जुलै २०२६ रोजी डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातही वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन आणि मारहाणीचा प्रकार घडला होता. नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला दाखल करण्यावरून तसेच एनआयसीयू बेड उपलब्ध नसल्याच्या मुद्द्यावरून शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी सहकाऱ्यांसह रुग्णालयात राडा केल्याचा आरोप झाला होता. या घटनेत डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचे सांगण्यात आले होते.

या घटनेनंतर राज्यातील डॉक्टरांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची मागणी करत आंदोलन केले होते. विरोधकांच्या दबावानंतर रमेश म्हात्रे यांना अटक करण्यात आली होती.

आता पालघरमधील ताज्या घटनेमुळे रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button