‘एमपीएससी’वर भाजपचा ताबा; राहुल गांधींचा महायुती सरकारवर घणाघात, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा

Rahul Gandhi | महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षांच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या संतापावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारवर तीव्र निशाणा साधला आहे. विद्यार्थ्यांचा हा संताप केवळ एखाद्या परीक्षेपुरता किंवा भरतीपुरता मर्यादित नसून, संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेवरून त्यांचा उडालेला विश्वास दर्शवतो, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत त्यांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांच्या प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरले.
भाजपच्या नेतृत्वाखालील धोरणांमुळे तरुण वर्ग पूर्णपणे भरडला गेला असल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या. वर्षानुवर्षे रखडलेल्या भरती प्रक्रिया आणि सातत्याने होणारी पेपरफुटी यामुळे तरुणांचे भविष्य अंधारात सापडले आहे. शिक्षणाचा भरमसाठ खर्च, वसतिगृहांची दुरवस्था, निकृष्ट दर्जाचे जेवण आणि ‘डीबीटी’ योजनांमधील गैरव्यवहार यांमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. तसेच, महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या (MPSC) घटनात्मक संस्थेवर भाजपने ताबा मिळवून तिची स्वायत्तता आणि विश्वासार्हता पूर्णपणे नष्ट केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
हेही वाचा
केतन अगरवाल खून प्रकरणात तिसऱ्या आरोपीला बेड्या; पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई
महाराष्ट्र में हजारों छात्र सड़कों पर हैं, शांतिपूर्ण तरीके से आंदोलनरत हैं – इसकी वजह सिर्फ एक परीक्षा या भर्ती नहीं, पूरे सिस्टम से टूट चुका भरोसा है।
चाहे वो केंद्र की हो या राज्य की, BJP सरकार से हर छात्र त्रस्त है। पेपर लीक, रुकी हुई भर्तियां, शिक्षा की असहनीय लागत, हॉस्टल…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 6, 2026
सरकारने तत्काळ दखल घ्यावी, अन्यथा आक्रोश वाढेल
आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि न्याय्य हक्कांसाठी विद्यार्थी करत असलेली प्रत्येक मागणी रास्त आहे, असे सांगत राहुल गांधी यांनी आंदोलक तरुणांना पाठिंबा दर्शवला. सरकारने तातडीने कठोर निर्णय घेऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात; अन्यथा न्याय मिळेपर्यंत हा लढा आणि तरुणांचा आक्रोश अधिक तीव्र होईल, असा इशाराही त्यांनी दिला.





