ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

धनगर एसटी आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करा!

अखंड धनगर समाजाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन; विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले

पिंपरी-चिंचवड | धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, तसेच समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहरातील अखंड धनगर समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. निगडी येथील नायब तहसीलदार देशमुख यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली विशेष अनुज्ञा याचिका महाराष्ट्र शासनाने पूर्ण ताकदीने आणि गांभीर्याने लढावी. धनगर आरक्षणाच्या समर्थनार्थ सर्व कायदेशीर व घटनात्मक बाबी स्पष्ट करणारे ठोस आणि सकारात्मक प्रतिज्ञापत्र ८ सप्टेंबर २०२६ पूर्वी सर्वोच्च न्यायालयात दाखल करावे. तसेच धनगर समाजाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी अनुभवी आणि सक्षम वकिलांची नियुक्ती करावी, अशी प्रमुख मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

धनगर एसटी आरक्षणाच्या संदर्भात कोणताही प्रतिकूल निर्णय आल्यास समाजाला एसटीचे प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने पर्यायी ‘प्लॅन बी’ तयार ठेवावा, अशी मागणीही समाजाच्या वतीने करण्यात आली.

श्री संत बाळूमामा देवस्थानाच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र विशेष शासकीय कायदा करावा. देवस्थानच्या विश्वस्त मंडळात किमान २१ विश्वस्तांचा समावेश असावा आणि अध्यक्षपद धनगर समाजातील व्यक्तीला देण्यात यावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा

आमदार शंकर जगताप यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठान पुणेच्या नियामक परिषदेवर नियुक्ती

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला स्वातंत्र्यवीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे, तसेच मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रेल्वे स्थानक’ असे करण्यात यावे, या मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे.

धनगर समाजाच्या न्याय्य आणि घटनात्मक हक्कांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे शासनाने समाजाच्या भावनांचा गांभीर्याने विचार करून सर्व मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि धनगर समाजाला न्याय द्यावा, अशी भूमिका अखंड धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.

निवेदन देताना माजी नगरसेवक राजाभाऊ दुर्गे, सूर्यकांत गोफणे, अजय दूधभाते, महादेव कवितके, धनंजय ताणले, बजरंग गडदे, सचिन सरक, विठ्ठल पांढरे, नरेंद्र चऱ्हाटे, मयुरेश चऱ्हाटे, नितीन वाघमोडे, अंबादास पडळकर, सदाशिव पडळकर, रेखा दूधभाते यांच्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयात समाजाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी राज्य शासनाने सक्षम वकिलांची नियुक्ती करून ठोस प्रतिज्ञापत्र दाखल करावे. आरक्षणासह समाजाच्या अन्य न्याय्य मागण्यांवरही तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा; अन्यथा धनगर समाजाला लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल.”

– राजु दुर्गे, अखंड धनगर समाज, पिंपरी-चिंचवड शहर

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button