एमआयटी आळंदीमध्ये महिला सक्षमीकरणासाठी शासकीय योजनांवर चर्चासत्र संपन्न; सुकन्या मंचचा पुढाकार

पुणे | एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या सुकन्या मंचतर्फे आज “महिला सक्षमीकरणासाठी शासकीय योजना” या विषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. सकाळी १०.०० वाजता सुरू झालेल्या या चर्चासत्रास महाविद्यालयातील विद्यार्थिनी व महिला प्राध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महिलांचे सक्षमीकरण, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकास या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या म्हणून संगीता शिवाजी जाधव उपस्थित होत्या.
आपल्या मार्गदर्शनात त्यांनी महिलांसाठी उपलब्ध असलेल्या शैक्षणिक, आर्थिक, आरोग्यविषयक, कौशल्यविकास, स्वयंरोजगार, उद्योजकता आणि सामाजिक सुरक्षेशी संबंधित विविध योजनांवर प्रकाश टाकला. या योजनांचा उद्देश, त्यातून मिळणारे लाभ, लाभार्थी होण्यासाठी आवश्यक पात्रतेचे निकष, आवश्यक कागदपत्रे तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया याबाबत त्यांनी सोप्या आणि सुलभ भाषेत माहिती दिली.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महिलांनी स्वतः जागरूक होण्याबरोबरच आपल्या कुटुंबातील व परिसरातील इतर महिलांनाही या योजनांची माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा
सायबर सुरक्षा अभियानात एमआयटी एसीएससी, आळंदीची उल्लेखनीय प्रगती
यासोबतच त्यांनी महिला हेल्पलाइनचे महत्त्व आणि महिलांच्या सुरक्षिततेमध्ये तिची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. कौटुंबिक हिंसाचार, छळ, अत्याचार, संकटाची परिस्थिती किंवा इतर कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी महिलांनी घाबरून न जाता उपलब्ध मदत यंत्रणेशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले.
महिलांनी आपल्या हक्कांविषयी जागरूक राहून आवश्यकतेनुसार शासकीय व कायदेशीर मदत घ्यावी, असा महत्त्वपूर्ण संदेशही त्यांनी दिला. त्यांचे मार्गदर्शन माहितीपूर्ण, प्रेरणादायी आणि महिलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले.
कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये महिला सक्षमीकरण, सुरक्षितता, स्वावलंबन आणि शासकीय योजनांचा प्रभावी लाभ घेण्याबाबत जागरूकता निर्माण झाली. कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रम समन्वयक डॉ. वैशाली साठे यांनी प्रमुख वक्त्या, मान्यवर, उपस्थित महिला आणि कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
आभार प्रदर्शनात कार्यक्रमाची सांगता झाली. हे चर्चासत्र संचालक डॉ. बी. बी. वाफारे, विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता डॉ. सुनील महाजन आणि सुकन्या मंच समन्वयक डॉ. अर्चना आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.





