घाटकोपरच्या दहीहंडीमधून पेपरफुटीवर मनसेचा निशाणा; MPSC, JEE, NEETचे पोस्टर चर्चेत
GEN-Zला समर्पित दहीहंडीचा दावा; विद्यार्थ्यांच्या पेपरफुटीविरोधातील लढ्याचा संदेश देत असल्याचे आयोजक गणेश चुक्कल यांचे वक्तव्य

मुंबई : राजधानी मुंबईसह राज्यभरात दहीहंडी उत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईतील दहीहंडी उत्सवांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, विविध मंडळांकडून सामाजिक आणि राजकीय संदेश देण्यात येत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवात बाराखडी, MPSC, JEE आणि NEET परीक्षांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. या माध्यमातून राज्यातील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावर मनसेने लक्ष वेधले आहे.
घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवासाठी पोलिस आणि महापालिकेने सुरुवातीला परवानगी दिली होती. मात्र, ऐनवेळी परवानगी नाकारण्यात आल्याचा आरोप आयोजकांनी केला आहे. तरीही दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर आपण ठाम असल्याचे आयोजकांनी सांगितले.
GEN-Zला समर्पित दहीहंडी
आयोजक गणेश चुक्कल यांनी ही दहीहंडी GEN-Zला समर्पित असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी NEET आणि इतर परीक्षांमधील कथित पेपरफुटीविरोधात दिलेल्या लढ्याचा आणि त्यातून मिळालेल्या विजयाचा हा जल्लोष असल्याचा दावा त्यांनी केला.
दहीहंडीच्या माध्यमातून पेपरफुटी कशा पद्धतीने होत आहे, याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न असल्याचेही आयोजकांनी स्पष्ट केले. दहीहंडीच्या मंचावर लावण्यात आलेल्या विविध परीक्षांच्या पोस्टरमुळे या उत्सवाची चर्चा रंगली आहे.
हेही वाचा – नूतन अभियांत्रिकी मध्ये स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२६ चे संस्थास्तरीय आयोजन
सेलिब्रिटींचीही उपस्थिती
घाटकोपरच्या दहीहंडी उत्सवात दिवसभरात अनेक सेलिब्रिटी सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांच्यासह भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनाही कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आल्याचे गणेश चुक्कल यांनी सांगितले.
दरम्यान, दहीहंडीच्या माध्यमातून सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा मनसेचा हा प्रयत्न चर्चेचा विषय ठरला आहे.





