ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

फॉरेव्हर २० एका शिक्षिकेचे मनोगत

पिंपरी-चिंचवड  :  प्रत्येकाचे वय त्याच्या जन्मदिनी वाढत असते, पण माझे वय वाढतच नाही. ते वर्षानुवर्षे वीसच आहे कारण मी एक शिक्षिका आहे. माझ्या अवतीभवती कायम विशीतीलच मुले असतात ज्यांच्या डोळ्यात स्वप्ने आहेत, अवखळपणा आहे, काही तरी करून दाखवण्याची उमेद आहे. मी कायम विशीतच राहणार आहे कारण मी याच वयातील मुलांना शिकवते. खरेतर प्रत्येक वर्षी मला माझे विद्यार्थीच कसे जगायचे शिकवत असतात. त्यांच्या पिढीला काय हवे आहे ते सांगतात. पटलं नाही तर वाद घालतात. मी त्यांची शिक्षिका असल्याने कित्येक वेळा निमूटपणे ऐकतातही . पण त्यांच्या डोळ्यातून, हालचालीतून मला त्यांचे विचार कळतात. काही वेळा मी दुर्लक्ष करते कारण मला दिलेला सिलॅबस पूर्ण करायचा असतो. तीही जबाबदारी मला पार पडायची असते.

कुणी तरी मला विचारले की “तेच तेच शिकवण्याचा कंटाळा येत नाही का तुला”? यावर माझे उत्तर असते की जरी मी तेच तेच शिकवते तरी विद्यार्थी दर वर्षी नवीन असतात, त्यांची आकलनशक्ती वेगळी असते. एकाच वर्गात अतिहुशार, हुशार आणि सर्वसामान्य असे सर्वजण एकत्र बसतात. अश्या सर्वांना एकत्र बांधून विषय शिकवण्याची जबाबदारी माझ्यावर असते. एखादी बॅच अभ्यासू असते तर एखादी त्या मुलांच्या व्रात्यपणामुळे लक्षात राहते. त्यामुळे प्रत्येक वर्षी त्यांना शिकवण्याची पद्धत बदलत असते. मागच्या वर्षी हा टॉपिक शिकवताना असे असे घडले होते, हा भाग नीट समजला नव्हता किंवा मलाही नीट समजून सांगता आला नव्हता, हे आठवते आणि मी त्याप्रमाणे बदल करत असते. माझा विषय स्थापत्य अभियांत्रिकी. सतत सर्वांच्या नजरेसमोर बांधकाम घडत असते, त्यामुळे त्यातील थोडेफार ज्ञान सर्वांना असतेच. शिवाय बऱ्याच मुलांच्या घरचा व्यवसाय हा या क्षेत्राशी निगडित असतो. त्यामुळे त्यांना वेगळे काहीतरी सांगण्याची जबाबदारी माझ्यावर असते. प्रत्येक तास मनोरंजक व्हावा यावर भर द्यावा लागतो नाहीतर पंधराव्या मिनिटाला समोर बसणारी मुले वेगळ्याच दुनियेत गेली स्पष्टपणे दिसत असतात. मग एखाद्या मुलाला उठवायचे, थोडे रागवायचे, प्रश्न विचारायचे असले प्रकार करावे लागतात. तेव्हाच समजावे की आता थोडे दमाने घ्यावे, सबुरीने घ्यावे. सुरुवातीला मला हा प्रश्न पडायचा की मी एवढे जीव तोडून शिकवते तर मुलांना समजत कसे नाही, हा विषय एवढा अवघडही नाही. का बरे यावरती विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर त्यांना देता येत नाही. थोडा मुलांचा रागही यायचा. मग मीच माझ्यात काही सुधारणा केल्या. सर्वप्रथम मी माझा संयम वाढवला. एकच टॉपिक दोन तीनदा समजावून देताना जणू प्रथमच शिकवत आहे तेवढ्याच उत्साहाने सांगत राहते. कधी यश मिळते तर कधी एखादे लेक्चर मलाच आवडत नाही. तासाच्या शेवटी मुले कंटाळली की समोर बसलेल्या विद्यार्थ्यांमधून एखादी विद्यार्थिनी मला गोष्ट सांगा असे सुचवते. मग तांत्रिक विषयातील काही कथा मी ऐकवते, उत्पादन वाढीबद्दल आम्ही चर्चा करतो, काहीवेळा तर भारतातील किंवा जगातील घडामोडींबद्दलही वादविवाद होतात. क्वचित मी मला आवडणारी एक ऍक्टिव्हिटी घेते ती म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला सुडोकू सोडवायला देणे. जो सर्वप्रथम सोडवतो त्याला चॉकोलेट बक्षीस मिळते. त्यामुळे मुलेही खुश आणि मी पण खुश.

हेही वाचा –  गायत्री स्कूलमध्ये कृष्णजन्माष्टमी व दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न; भक्ती आणि संस्कृतीचा अनोखा संगम

माझ्या शिक्षकी पेशाच्या सुरुवातीच्याच दोन तीन वर्षातील घटना. मी अगदीच नवखी होते. अजून एक बॅच सुद्धा माझ्याकडून शिकून बाहेर पडली नव्हती. माझ्या परीने मी चांगल्यात चांगले शिकवावे याची तयारी करत होते. दुपारची वेळ होती. आमच्या स्टाफ रूममध्ये एक नुकताच इंजिनियर झालेला माजी विद्यार्थी आला. बाकीच्या शिक्षकांशी बोलत होता. कुणीतरी त्याला माझी ओळख करून दिली. माझ्याकडे बघत तो म्हणाला “ओह, तुम्हीच पाटसकर मॅडम का? मी तुमच्या बद्दल खूप ऐकले आहे, तुम्ही खूप छान शिकवता म्हणून”. मला वाटते की माझी स्वतंत्र ओळख त्या क्षणापासून सुरु झाली. मला कोण आनंद झाला होता त्या दिवशी! मला अजून हुरूप आला. अशीच काही वर्षे गेली. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये माझी चांगली ओळख निर्माण झाली होती. तसा मी शिकवत असलेला विषय फार अवघड नाही पण फार इंटरेस्टिंग आहे. सुरुवातीला फळा, खडू आणि डस्टर हेच साहित्य शिकवण्यासाठी वापरले जायचे. मग पुढे पारदर्शक प्लास्टिक कागदांचा उपयोग करून शिकवण्याचे तंत्र आले. त्या पारदर्शक कागदावर म्हणजेच ट्रान्स्परन्सीवर मार्कर पेनाने लिहायचे आणि ते पांढऱ्या भिंतीवर किंवा पडद्यावर प्रतिबिंबित करायचे. त्यासाठी एका काचेच्या पेटीत दिवा ठेवून त्यावर ट्रान्स्परन्सी ठेवली जायची. मुलांना मोठ्या स्क्रीनवर ते छान दिसायचे, शिवाय मलाही ते बरे पडायचे. काही मोठ्या गणितांसाठी एकदाच अश्या ट्रान्स्परन्सीज तयार केल्या की वेळ वाचायचा. मग त्यावर अनेक प्रयोग होऊ लागले. एकाच वेळी दोन तीन ट्रान्स्परन्सीज ठेवून विषय समजावून देणे सोपे व्हायला लागले. बरोबरच्या शिक्षकांशी यातीलच एखादी नवीन क्लुप्ती शेअर करायला लागले. “मुलांना कसे शिकवावे” थोडक्यात अध्यापन-अध्ययन प्रक्रिया समजावून घेण्यासाठी अनेक वर्कशॉपला जायला लागले. याच दरम्यान अध्यापकांच्या शैक्षणिक अर्हता वाढवण्यासाठी कॉलेज व्यवस्थापनाकडून प्रोत्साहन मिळू लागले. पदव्युत्तर शिक्षण घेणे अनिवार्य ठरले. त्यावेळी मी शिक्षक आणि विद्यार्थी या दोन्ही भूमिकेत आले आणि माझ्या विद्यार्थ्यांकडे मी अजून वेगळया चष्म्यातून बघायला लागले.

हळूहळू माझे वय वाढले, कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या आणि माझ्या वयात अंतर वाढत गेले. जनरेशन गॅप मुळे काही वेळा मी अस्वस्थही व्हायचे. मात्र मुलांची एनर्जी माझ्यापर्यंत पोहोचतही होती. केवळ मुलांसाठी असलेल्या अनेक समित्यांमधून मी काम पाहत होते याचा फायदा मला शिकवताना सुद्धा झाला. आता मला बऱ्यापैकी शिकवता येते असे मी स्वतःबद्दल म्हणू शकते. कालांतराने माझी मुले मोठी झाली. दिवसभरच्या घडामोडी रात्री जेवताना सांगताना मुलांची दुसरी बाजूही कळू लागली. केवळ शिकवतानाच नाही तर वर्गाबाहेर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना याचा मला खूप उपयोग झाला. समाजाच्या अनेक स्तरांवरून येणारी ही मुले, कुणी गरीब तर कुणी थोडे आगाऊ, कुणी सदा उत्साही तर कुणी सतत गंभीर, कुणी हुशार तर कुणाचे विषय राहिलेले, कुणी जवळपास राहणारे तर कुणी आई वडिलांपासून लांब होस्टेलवर राहणारे. मला कित्येकांच्या गावांची नावे माहीतही नसतात, पण एकच गोष्ट खरी असते की सर्व विद्यार्थी चांगलीच असतात. त्यातील कुणी थोडीफार बिघडलेली असू शकतात पण एका मर्यादेच्या बाहेर ती जात नाहीत, निदान कॉलेज मध्ये असे पर्यंत तरी. कोणत्याही विद्यार्थ्याला एखादे काम दिले तर ते चोख होऊ शकते याची खात्री असते. सध्या अधिष्ठाता, विद्यार्थी कल्याण या पदावर असल्याने माझा सर्वात जास्त वेळ मुलांबरोबर जातो. त्यांच्यातील एनर्जी बघून थक्क व्हायला होते. अनेकानेक कल्पना त्यांच्या मनात असतात. आपण फक्त त्यांना टेकू द्यायचा असतो. मात्र अजूनही हे तंत्र मी शिकत आहे आणि बहुधा माझ्या निवृत्तीपर्यंत मी शिकतच राहणार आहे.

माझ्या गेल्या एकतीस वर्षांच्या शैक्षणिक कार्यकीर्दीत अनेक विद्यार्थी हाताखालून गेले. आजही माझे कित्येक विद्यार्थी मला भेटण्यासाठी म्हणून कॉलेजला येतात.. माजी विद्यार्थी भेटले की खूप आनंद होतो, सर्वांची नावे लक्षात ठेवणे शक्यच नसते पण तरी त्यातील काहींची आठवतात. काही जण वर्गात तज्ज्ञ वक्ता म्हणून त्यांचे अनुभव सांगायला येतात. मानधन दिले तर नकार देतात, त्यांच्या कॉलेजमधील आठवणी मला सांगत असतात, बाकीच्या शिक्षकांची विचारपूस होते, त्यांच्या बॅचच्या इतर मुलांविषयी चौकशी होते, ते चांगल्या हुद्द्यावर आहेत हे कळल्यावर आनंद होतो. काही वेळा हे माजी विद्यार्थी एकमेकांना बाहेर भेटल्यावर त्यांच्या बोलण्यात माझा विषय निघतो. “मॅडम रागावयाच्या पण त्या किती योग्य बोलायच्या याचा प्रत्यय आता येतो” असे ते सांगतात आणि हे ऐकले की माझे कान तृप्त होतात. मला भेटायला आल्यावर माझ्या टेबल वर असलेल्या चॉकलेट्स च्या डब्यातून एक चॉकोलेट आवर्जून घेऊन जातात. भरपूर वेळ गप्पा होतात, आम्ही दोघेही काही वर्षे मागे जातो आणि त्या एकाच वयाचे होतो कारण मी सुद्धा त्याला शिकवताना त्याच्याच वयाची झालेली असते.

मग, आहे की नाही मी फॉरेव्हर २०?

डॉ स्मिता पाटसकर
स्थापत्य अभियांत्रिकी विभाग
डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, आकुर्डी, पुणे

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group