शहरातील कचरा संकलनातील बोजवाऱ्यावर कविता भोंगाळे आक्रमक!
प्रभाग क्रमांक ५ मधील कचरा, डेंग्यूच्या प्रश्नावर प्रशासनाला धरले धारेवर

पिंपरी- चिंचवड । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रभाग क्रमांक ५ मधील कचरा संकलन आणि डेंग्यूच्या प्रश्नावर नगरसेविका कविता भोंगाळे यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. कचरा संकलन व्यवस्थेतील त्रुटी, नागरिकांना होणारा त्रास आणि परिसरातील वाढत्या डासांच्या समस्येकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
क्षेत्रीय कार्यालयाकडून तात्पुरते कचरा डंपिंगचे ठिकाण म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर आणि संत ज्ञानेश्वर महाराज नगर परिसरातील जागा सांगण्यात आली आहे. मात्र, अशा महत्त्वाच्या ठिकाणी कचरा डंपिंगची जागा निश्चित करताना स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेतले गेले नाही, असा आक्षेप भोंगाळे यांनी नोंदविला.
कचरा साठविण्यासाठी योग्य नियोजन नसल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण होत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. कचरा संकलनाची व्यवस्था सुरळीत करण्याबरोबरच डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
हेही वाचा – मुलांच्या आरोग्यासाठी घरात ठेवा ही 5 झाडे; हवा शुद्ध ठेवण्यासह घरातील वातावरणही राहील प्रसन्न
दरम्यान, धार्मिक स्थळे आणि पालखी मार्गालगत कचरा डंपिंगची जागा करणे योग्य आहे का?, असा सवाल उपस्थित करत भोंगाळे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला जाब…
सभागृहात डेंग्यूच्या प्रश्नावरही भोंगाळे यांनी आक्रमक भूमिका घेतली. नागरिकांच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या लोकप्रतिनिधींना प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी फवारणी, स्वच्छता आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणांवर प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली. कचरा संकलन व्यवस्था आणि आरोग्यविषयक उपाययोजना यामध्ये समन्वयाचा अभाव राहिल्यास नागरिकांना त्याचा थेट फटका बसतो. त्यामुळे प्रभागातील कचरा व्यवस्थापन आणि डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजनांबाबत प्रशासनाने तातडीने कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी कविता भोंगाळे यांनी केली. सभागृहात मांडलेल्या या प्रश्नांमुळे प्रभाग क्रमांक ५ मधील कचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“प्रभाग क्रमांक ५ मध्ये कचरा संकलनाची व्यवस्था कोलमडली असून, नागरिकांना अस्वच्छता आणि डेंग्यूच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. धार्मिक स्थळे व पालखी मार्गालगत कचरा डंपिंगची जागा निश्चित करण्यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणे गरजेचे आहे. प्रशासनाने केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात.”
— कविता भोंगाळे, नगरसेविका, भाजपा.





