पाकिस्तानात १०० वर्षे जुन्या ऐतिहासिक हिंदू मंदिराची तोडफोड; भारताचा तीव्र संताप

नवी दिल्ली | पाकिस्तानातील नारोवाल जिल्ह्यात एका १०० वर्षांहून अधिक जुन्या ऐतिहासिक हिंदू मंदिराची विटंबना आणि तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेवर भारताने तीव्र संताप व्यक्त केला असून या घृणास्पद कृत्याचा कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे. पाकिस्तान सरकारने या प्रकरणाची तात्काळ व पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि मंदिराची पुनर्बांधणी करावी, अशी ठाम मागणी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या घटनेवर भारताची अधिकृत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “पाकिस्तानमधील नारोवाल जिल्ह्यातील सिरोज गावात एका ऐतिहासिक हिंदू मंदिराची तोडफोड झाल्याची घटना अत्यंत चिंताजनक आहे. अल्पसंख्याकांच्या एका शतक जुन्या धार्मिक स्थळाची विटंबना करणाऱ्या या कृत्याचा भारत तीव्र शब्दांत निषेध करतो.”
हेही वाचा
एसटीपी शुल्कावरून संजीवन सांगळे आक्रमक; “सोसायटीधारकांवर निर्णय लादला तर तीव्र आंदोलनाचा इशारा”
स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना रणधीर जयस्वाल पुढे म्हणाले, “एका १०० वर्षे जुन्या वारसास्थळाचे रक्षण करण्यात आलेले अपयश आणि तेथील प्रशासनाची उदासीनता अत्यंत गंभीर बाब आहे. पाकिस्तानात अल्पसंख्याक समाज आजही किती असुरक्षित आहे आणि त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर कशा प्रकारे गदा आणली जात आहे, हेच यावरून पुन्हा एकदा सिद्ध होते.”
मंदिराची तातडीने डागडुजी करण्याची मागणी
भारताने पाकिस्तान सरकारला त्यांच्या घटनात्मक व नैतिक जबाबदाऱ्यांची आठवण करून दिली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा सुनावण्यात यावी, तसेच विटंबना झालेल्या ऐतिहासिक मंदिराची तात्काळ डागडुजी करून ते पूर्ववत करावे, अशी मागणी भारताने लावून धरली आहे. आपल्या देशातील अल्पसंख्याक नागरिकांचे जीवन, सुरक्षा आणि त्यांच्या धार्मिक-सांस्कृतिक वारशाचे रक्षण करणे ही तेथील सरकारची प्राथमिक जबाबदारी असल्याचा इशाराही नवी दिल्लीने दिला आहे.





