TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

भाजयुमोला रवींद्र चव्हाणांचा सल्ला; ‘युवकांना शिक्षित करा, सकारात्मक आंदोलनाला प्राधान्य द्या’

पुण्यातील मोदींच्या तसबिरीच्या मुद्द्यावरून झालेल्या आंदोलनानंतर पक्षाची भूमिका स्पष्ट; कृष्णराज महाडिक म्हणाले, ‘चव्हाणांचे मार्गदर्शन तंतोतंत पाळू’

मुंबई : पुण्यातील एका महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तसबीर हटविण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरोधात आंदोलन करणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या नेत्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी चांगलेच सुनावले. पक्षाच्या मुंबई कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी भाजयुमोच्या आंदोलनाच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त करत तरुण नेत्यांना आंदोलन करताना संयम बाळगण्याचा सल्ला दिला.

“काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो म्हणून आंदोलन नको,” अशा शब्दांत रवींद्र चव्हाण यांनी भाजयुमोच्या नेत्यांचे कान टोचले. आक्रमक आंदोलन करण्यापेक्षा पक्षाची भूमिका आणि आंदोलनाची राजकीय उपयुक्तता लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यात नेमकं काय घडलं?

पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पाहणीदरम्यान मनसे नेते अमित ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तसबिरीच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तसबीर लावण्यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी मोदींची तसबीर तेथून हटवली.

या घटनेनंतर भाजयुमोने आक्रमक भूमिका घेत मनसेच्या प्रमुखांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याआधीच मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने तेथे जमा झाले. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

हेही वाचा –  पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापुरुषांच्या जयंत्या, सांस्कृतिक कार्यक्रम व राष्ट्रीय उत्सवांसाठी सर्वसमावेशक धोरण

युवकांना शिक्षित करायचंय, गुंड तयार करायचे नाहीत’

या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांनी भाजयुमोच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. “आम्हाला युवकांना शिक्षित करायचे आहे, गुंड तयार करायचे नाहीत,” असे स्पष्ट करत त्यांनी तरुण पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक आंदोलनाचा गांभीर्याने विचार करावा, असा सल्ला दिला.

पक्षाच्या विचारधारेनुसार आणि राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन आंदोलन करणे गरजेचे असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

कृष्णराज महाडिक म्हणाले, ‘चव्हाणांचे आदेश पाळू’

रवींद्र चव्हाण यांच्या नाराजीवर भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनीही प्रतिक्रिया दिली. “रवींद्र चव्हाण आमचे नेते आहेत. त्यांनी दिलेले मार्गदर्शन आणि आदेश आम्ही तंतोतंत पाळू,” असे महाडिक यांनी सांगितले.

मोदींची तसबीर हटविण्याच्या घटनेनंतर तरुणांमध्ये निर्माण झालेल्या संतापाला आंदोलनाच्या माध्यमातून वाट करून देण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, यापुढील आंदोलनांमध्ये ‘गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते तयार होणार नाहीत’ याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासनही महाडिक यांनी दिले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button