उज्जैनमध्ये शाही मशिदीवर बुलडोझर चालवण्यापूर्वी तणाव; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक

Ujjain | मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात आगामी सिंहस्थ महाकुंभ २०२८ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांदरम्यान जोरदार राडा झाला. अब्दालपुरा भागातील ऐतिहासिक शाही मशिदीचा काही भाग पाडण्यासाठी प्रशासनाचे बुलडोझर दाखल होताच मुस्लिम समुदायातील दोन गटांत मतभेद उफाळून आले. एका गटाने कारवाईला पाठिंबा दिला, तर दुसऱ्या गटाने कडाडून विरोध करत आंदोलन छेडले. आंदोलकांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक केल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
उज्जैनमध्ये २०२८ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रस्ते रुंदीकरण आणि पायाभूत सुविधांची मोठी कामे सुरू आहेत. या मोहिमेत अनेक बांधकामांवर हातोडा चालवण्यात आला असून, यामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या आजोबांनी बांधलेल्या वडिलोपार्जित घराच्या एका भागाचाही समावेश होता. याच रुंदीकरण मोहिमेचा भाग म्हणून अब्दालपुरा येथील शाही मशिदीचा काही भाग पाडण्याचे प्रशासनाने निश्चित केले होते. मात्र, रविवारी रात्रीपासूनच या कारवाईला विरोध करत नागरिक एकत्र जमू लागले. सोमवारी सकाळी पथक दाखल होताच वादाची ठिणगी पडली आणि जमावाने पोलिसांवर दगडफेक केली.
हेही वाचा
‘CJP’च्या २ ऑक्टोबरच्या आंदोलनाला सोनम वांगचुक यांचा पाठिंबा; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी
#WATCH | Madhya Pradesh: Police use tear gas shells to control a crowd in Ujjain as stone pelting occurred when a large group of people clashed with them at the spot where a portion of Shahi Masjid is planned to be demolished for a road-widening project. Rapid Action Force (RAF) personnel are also present at the spot.
— ANI (@ANI) September 28, 2026
मशीद समिती आणि स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्ता रुंदीकरणासाठी पर्यायी मार्गाचा विचार करावा किंवा समोरील इमारती हटवून रुंदीकरण करावे. ही मशीद वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत धार्मिक स्थळ असल्याने प्रशासनाने संवेदनशील भूमिका घेणे गरजेचे होते. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाने ९ सप्टेंबर रोजी कारवाईविरोधातील याचिका फेटाळल्यानंतर मशीद समितीने खंडपीठाच्या डिव्हिजन बेंचकडे धाव घेतली असून, त्यावर सुनावणी प्रलंबित असतानाच ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
२ हजार पोलिसांचा बंदोबस्त, परिसर सील
दगडफेकीच्या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून मशिदीच्या ५०० मीटर परिसरात चारही बाजूंनी सुमारे २ हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संपूर्ण भाग बॅरिकेड्स लावून सील करण्यात आला आहे. आंदोलनात महिलांचाही मोठा सहभाग होता. पोलीस आणि प्रशासनाने आंदोलकांशी चर्चा करून समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस संपूर्ण परिसरावर करडी नजर ठेवून आहेत.





