TOP News । महत्त्वाची बातमीआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी

डोकेदुखी, ताप आला की लगेच पेनकिलर घेता? सावधान! चुकीच्या वापरामुळे किडनीला धोका, अँटिबायोटिक्सही ठरू शकतात निष्प्रभ

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळा; अँटिबायोटिक्सचा चुकीचा वापर वाढवतो औषध प्रतिकाराचा धोका

मुंबई : डोके दुखले की पेनकिलर, अंग दुखले की वेदनाशामक गोळी आणि ताप आला की पूर्वी डॉक्टरांनी दिलेले औषध घेण्याची सवय अनेकांना असते. सर्दी-खोकला दोन दिवसांत कमी झाला नाही, तर इतरांच्या सल्ल्याने अँटिबायोटिक्स घेण्याचे प्रकारही दिसतात. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांचा वापर करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. वेदनाशामक औषधांचा वारंवार वापर आणि गरज नसताना अँटिबायोटिक्स घेण्याबाबत औषध नियामक यंत्रणेने सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

पेनकिलरच्या अतिवापरामुळे मूत्रपिंडाला धोका

वेदना आणि सूज कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक औषधांचा समावेश नॉन-स्टेरॉयडल अँटी-इन्फ्लेमेटरी ड्रग्ज (NSAIDs) या गटात होतो. ही औषधे योग्य कारणासाठी आणि योग्य मात्रेत घेतल्यास उपयोगी ठरतात. मात्र, त्यांचा चुकीच्या पद्धतीने, जास्त मात्रेत किंवा दीर्घकाळ वापर केल्यास दुष्परिणाम होऊ शकतात. विशेषतः मूत्रपिंडाचा आजार असलेल्या किंवा मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी होण्याचा धोका असलेल्या व्यक्तींनी ही औषधे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

वारंवार वेदना होत असल्यास केवळ पेनकिलर घेऊन त्रास दाबण्याऐवजी त्यामागील कारण शोधणे महत्त्वाचे आहे. आधी घेतलेली गोळी पुन्हा वापरण्यापूर्वीही ती सध्याच्या त्रासासाठी योग्य आहे का, याची खात्री करावी.

हेही वाचा –  SIR विरोधातील दिल्ली आंदोलनापूर्वी कार्यकर्त्यांवर पोलिसांची नजर? विद्यार्थ्यांना फोन, इटारसीत १८ जणांना ट्रेनमधून उतरवल्याचा आरोप

सर्दी-खोकल्यासाठी स्वतःहून अँटिबायोटिक्स नकोत

सर्दी, खोकला आणि काही प्रकारचे ताप हे विषाणूजन्य संसर्गामुळे होऊ शकतात. अँटिबायोटिक्स ही औषधे जीवाणूंविरुद्ध काम करतात; विषाणूंवर त्यांचा परिणाम होत नाही. त्यामुळे सामान्य सर्दी किंवा विषाणूजन्य संसर्गासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटिबायोटिक्स घेणे टाळावे.

डॉक्टरांनी अँटिबायोटिक लिहून दिल्यास त्याची मात्रा, औषध घेण्याची वेळ आणि उपचारांचा कालावधी त्यांच्या सूचनेनुसार पाळावा. बरे वाटू लागल्यावर औषध स्वतःहून बंद करू नये किंवा उपचारात बदल करू नये. त्याचप्रमाणे, पूर्वीच्या उपचारांतील उरलेल्या गोळ्या पुन्हा घेणे अथवा स्वतःसाठी दिलेली अँटिबायोटिक दुसऱ्या व्यक्तीला देणे चुकीचे आहे.

अँटिबायोटिक्सचा परिणाम कमी होण्याचा धोका

अँटिबायोटिक्सचा गरज नसताना किंवा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याने अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स अर्थात सूक्ष्मजीवांमध्ये औषधांविरोधात प्रतिकार निर्माण होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत भविष्यात जीवाणूंच्या संसर्गासाठी अँटिबायोटिकची गरज भासल्यास काही औषधे अपेक्षित परिणाम देत नाहीत. परिणामी उपचार अधिक गुंतागुंतीचे होऊ शकतात.

त्यामुळे कोणतेही औषध स्वतःहून सुरू करणे, मात्रा वाढवणे किंवा उपचार बदलणे टाळावे. औषध घेण्यापूर्वी डॉक्टर किंवा पात्र आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. औषधांचा योग्य वापर केल्याने अनावश्यक दुष्परिणाम टाळण्यास आणि भविष्यातील उपचारांसाठी अँटिबायोटिक्सची परिणामकारकता टिकवून ठेवण्यास मदत होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button