Nepal Floods: मृतांचा आकडा ९३९ वर, ४ हजारांहून अधिक नागरिक अजूनही बेपत्ता

Nepal Floods | नेपाळमध्ये बुधवारी ओढवलेल्या भीषण महापुरात मृतांचा आकडा तब्बल ९३९ वर पोहोचला असून, अजूनही ४ हजारांपेक्षा जास्त लोक बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. ढिगाऱ्याखालून आणि नदीपात्रातून सातत्याने मृतदेह बाहेर काढले जात असल्याने मृतांची संख्या वेगाने वाढत आहे.
नेपाळच्या ‘नॅशनल डिझास्टर रिस्क रिडक्शन अँड मॅनेजमेंट ऑथॉरिटी’ने (एनडीआरआरएमए) दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत चितवन जिल्ह्यतून २७९, नवलपारसी पूर्वमधून २१६, नवलपारसी पश्चिममधून १६८, गोरखा जिल्ह्यतून ६५ मृतदेह सापडले आहेत. त्याबरोबरच नुवाकोट जिल्ह्यत ९५, धडिंगमध्ये ५५, तनाहूमध्ये ३८ आणि रसुवा जिल्ह्यत २३ मृतदेह हाती लागले. एकूण ४,२४७ लोक बेपत्ता असून त्यामध्ये ९९ सुरक्षा सैनिकांचा समावेश आहे.
हेही वाचा
“आता युद्धाच्या समाप्तीकडे वळलं पाहिजे”; पंतप्रधान मोदींचे पुतिन यांना युद्ध थांबवण्याचे थेट आवाहन
३९ देशांचे ५९१ नागरिक बेपत्ता; बचावकार्याला मर्यादा
नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार, भारत, अमेरिका, चीन, रशिया, ब्रिटन, स्पेन, जर्मनीसह ३९ देशांतील ५९१ नागरिक बेपत्ता आहेत. आतापर्यंत १० हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून यात ३२३ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. नेपाळ-तिबेट जोडणारा भोटेकोशी मार्ग आणि रसुवागाधी येथील सीमा रस्ता वाहून गेल्याने संपर्क पूर्णपणे तुटला आहे. साधनसामग्रीच्या कमतरतेमुळे जवानांना स्वतःचा जीव धोक्यात घालून बचावमोहीम राबवावी लागत आहे.
महाराष्ट्रातील ६७ पर्यटकांचा शोध सुरू
नेपाळमध्ये महाराष्ट्रातील एकूण ४०५ नागरिक अडकले होते. त्यापैकी ६७ पर्यटक अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. अडकलेल्या २६२ जणांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत, तर उर्वरित ७६ जण प्रशासनाच्या नियमित संपर्कात आहेत. संपर्कात नसलेल्या पर्यटकांच्या शोधमोहिमेसाठी केंद्र सरकारचे विशेष पथक काठमांडू येथे दाखल झाले आहे.





