महाप्रसाद, लंगर, भंडाऱ्यांतील अन्नावर FDAची नजर; तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय
सर्व धर्मीय सणांसाठी वर्षभराचा स्थायी आदेश; सणाच्या 21 दिवस आधीपासून 30 दिवसांपर्यंत चार टप्प्यांत अन्नभेसळविरोधी कारवाई

मुंबई : सण-उत्सवांच्या काळात भाविक आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाच्या गुणवत्तेवर आता अन्न आणि औषध प्रशासनाची (FDA) थेट नजर राहणार आहे. अन्नातील भेसळ आणि अस्वच्छतेला आळा घालण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘स्टँडिंग ऑर्डर्स फॉर ऑल फेस्टिव्हल्स’ हा स्थायी आदेश लागू करण्याची घोषणा केली आहे.
या निर्णयानुसार वर्षभर साजऱ्या होणाऱ्या विविध धर्मीय आणि प्रादेशिक सणांसाठी स्वतंत्रपणे आदेश काढण्याची गरज राहणार नाही. महाप्रसाद आणि सार्वजनिक अन्नवाटपाच्या ठिकाणी प्रत्यक्ष तपासणी केली जाणार असून, अन्नाच्या गुणवत्तेसह स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन होत आहे की नाही, याचीही पाहणी केली जाईल.
सणांचे तीन स्तरांत वर्गीकरण
सणांच्या काळात मिठाई, खवा, पनीर, तूप, सुकामेवा तसेच मांसाहारी पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे या काळात भेसळीचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन FDAने वर्षभराचे सणांचे कॅलेंडर तयार केले आहे.
या कॅलेंडरनुसार सणांचे तीन स्तरांत वर्गीकरण करण्यात आले आहे.
पहिला स्तर – राज्यव्यापी सण : गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, ईद, नाताळ आणि नववर्ष पूर्वसंध्या यांचा समावेश आहे.
दुसरा स्तर – प्रादेशिक सण : मकर संक्रांती, महाशिवरात्री, होळी, गुढीपाडवा, आषाढी आणि कार्तिक वारी, श्रावण मास, जन्माष्टमी, दहीहंडी, कोजागिरी तसेच गुरुनानक जयंती यांचा समावेश करण्यात आला आहे.
तिसरा स्तर – स्थानिक सण : स्थानिक जत्रा, पालखी सोहळे आणि उरुस यांचा या श्रेणीत समावेश आहे.
हेही वाचा – उच्च न्यायालयात धाव घेताच प्रशासन नमले; पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महासभेचे लाईव्ह प्रक्षेपण पुन्हा सुरू
सणाच्या 21 दिवस आधीपासून तपासणी
अन्नभेसळविरोधी कारवाई सणाच्या 21 दिवस आधी सुरू होऊन सण संपल्यानंतर 30 दिवसांपर्यंत सुरू राहणार आहे. ही मोहीम चार टप्प्यांत राबवली जाणार आहे.
पहिला टप्पा – पूर्वतयारी : हाय रिस्क अन्नपदार्थांचे मॅपिंग, विशेष पथकांची नियुक्ती आणि प्रयोगशाळांना पूर्वसूचना देण्यात येईल.
दुसरा टप्पा – नाका तपासणी : गिरण्या, घाऊक बाजारपेठा आणि अन्नपदार्थांच्या वाहतुकीवर लक्ष ठेवले जाईल. पहाटेच्या वेळी विशेष नाका तपासणीही केली जाणार आहे.
तिसरा टप्पा – सणाच्या दिवशी तपासणी : विशेष भरारी पथकांकडून महाप्रसाद, लंगर, भंडारे आणि इतर अन्नवाटपाच्या ठिकाणी अचानक तपासणी केली जाईल.
चौथा टप्पा – कायदेशीर कारवाई : नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करून खटले दाखल केले जातील. संबंधित अहवाल आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे.
‘हाय रिस्क’ अन्नपदार्थांवर विशेष लक्ष
उपवासाच्या पदार्थांमध्ये भगर, साबुदाणा आणि राजगिरा यांचे नमुने आधीच घेऊन तपासणी केली जाणार आहे. बुरशीजन्य पदार्थांवरही विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
मांस, पाणी आणि बर्फाच्या बाबतीत स्वच्छता, शीत साखळी आणि अधिकृत कत्तलखान्यांची वैधता तपासली जाईल. मिठाईवर वापरण्यात येणारा चांदीचा वर्ख खरोखर चांदीचा आहे का, तसेच खाद्यरंगांचा वापर निर्धारित मर्यादेत होत आहे का, याचीही तपासणी केली जाणार आहे.
विशिष्ट सणांच्या अनुषंगानेही स्वतंत्र तपासणी केली जाणार आहे. अक्षय्य तृतीयेला फळे पिकवण्याच्या पद्धती, नाताळच्या काळात बेकरी उत्पादने, तर रमजान आणि ईदच्या काळात विशेष अन्नपदार्थांची तपासणी केली जाणार आहे.
ई-कॉमर्सपासून पॅकबंद पाण्यापर्यंत नजर
FDAच्या या मोहिमेत ई-कॉमर्सच्या माध्यमातून विकल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांसह आयात केलेले अन्न, बेकरी उत्पादने आणि पॅकबंद पाण्याचाही समावेश असेल. अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरणानुसार कारवाई केली जाणार आहे.
सण संपल्यानंतर 14 दिवसांच्या आत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोषींविरोधात न्यायालयात खटले दाखल करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे यापुढे प्रत्येक सणासाठी स्वतंत्र आदेश काढण्याची गरज राहणार नसून, वर्षभरासाठी लागू असलेला हा स्थायी आदेश अन्नभेसळ आणि अन्नसुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.





