दिव्यांग महिलेवरील अत्याचार प्रकरणी कठोर कारवाईची मागणी
पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
शहरात एका दिव्यांग महिलेवर झालेल्या अमानुष व पाशवी अत्याचाराच्या घटनेने समाजात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नगरसेविकांच्या शिष्टमंडळाने राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांची भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन सादर केले. या भेटीनंतर उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर यांना प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कठोर कारवाईचे निर्देश दिले.
काय घडली घटना?
शहरातून यापूर्वीच हद्दपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार किशोर पवार याने एका दिव्यांग महिलेला बेदम मारहाण केली. तिचे केस कापून तिला विद्रूप करण्यात आले, तसेच तिला नग्न करून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला. एवढ्यावरच न थांबता या क्रूर कृत्याचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण शहरात संतापाची भावना निर्माण झाली.
हेही वाचा – मराठा-कुणबी प्रमाणपत्रासाठी १० ते १७ सप्टेंबरदरम्यान विशेष शिबिरे; ८ जिल्ह्यांत नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी
या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असली, तरी पीडितेच्या इच्छेविरुद्ध व जबरदस्तीने घडलेल्या या कृत्याबाबत भारतीय दंड विधान कलम ३७६ (बलात्कार) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत अधिक कठोर गुन्हे दाखल करणे आवश्यक असल्याचे शिष्टमंडळाने ठामपणे मांडले. आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला असल्याने भविष्यात अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी अधिक कठोर कलमे लावण्याची विनंतीही करण्यात आली.
उपमुख्यमंत्र्यांचे तातडीने निर्देश
शिष्टमंडळाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संबंधित पोलीस प्रशासनाला प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले.
शिष्टमंडळात कोण कोण सहभागी?
या शिष्टमंडळात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माजी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, नगरसेविका अश्विनी वाबळे, माजी नगरसेविका आशा शेंडगे, नगरसेविका वैशाली काळभोर, माया बारणे, निकिता कदम, भीमाताई फुगे, प्रियंका कुदळे, दीप्ती कांबळे तसेच सामाजिक कार्यकर्त्या प्रीतम शिंदे यांच्यासह इतर महिला कार्यकर्त्यांचा समावेश होता.





