Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

MPSCच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादीचे जनआंदोलन; जितेंद्र आव्हाडांचा इशारा

भरती प्रक्रियेतील गैरप्रकार आणि पेपरफुटीचा आरोप; विद्यार्थ्यांच्या हितासाठी राज्यभर आंदोलन उभारणार

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कामकाजातील त्रुटी आणि भरती प्रक्रियेत समोर आलेल्या कथित गैरप्रकारांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या भरती प्रक्रियेदरम्यान पेपरफुटीचा प्रकार समोर आल्याचा दावा करत MPSCच्या विरोधात राज्यभर जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पक्षाच्या आगामी भूमिकेबाबत माहिती दिली.

लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ

राज्यातील लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असून, अनेक वर्षे मेहनत आणि वेळ खर्च करून ते परीक्षांना सामोरे जातात. मात्र, भरती प्रक्रियेतील गैरकारभारामुळे त्यांच्या भवितव्यावर परिणाम होत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला.

‘विद्यार्थ्यांच्या हितासाठी MPSCविरोधात जनआंदोलन उभारण्यात येईल,’ असे आव्हाड यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –  १७ दिवसांच्या लढ्याला यश; मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण अखेर मागे

स्मार्ट मीटर, महागाई आणि खड्ड्यांवरून सरकारवर टीका

राज्यातील आर्थिक परिस्थिती, महागाई, दुष्काळ आणि कर्जमाफीच्या मुद्द्यांवरूनही आव्हाड यांनी सरकारवर निशाणा साधला. एकेकाळी महाराष्ट्राची ओळख रोजगारनिर्मिती करणारे राज्य अशी होती; मात्र आता हातातील नोकऱ्या काढून घेणारे राज्य अशी स्थिती निर्माण झाल्याची टीका त्यांनी केली.

ठाण्यासह राज्यातील विविध शहरांमधील रस्त्यांवरील खड्डे, स्मार्ट मीटर आणि सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्यांवर दाखल होणारे गुन्हे यावरही त्यांनी भाष्य केले. स्मार्ट मीटरविरोधात भविष्यात जनआंदोलन उभारले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा घटनात्मक अधिकार असून, समाजमाध्यमांवर सक्रिय असलेल्या किंवा सरकारविरोधात भूमिका मांडणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसची कायदेविषयक टीम त्यांना मदत करेल, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले.

शरद पवार, रोहित पवार बैठकीला अनुपस्थित

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीला पक्षाध्यक्ष शरद पवार आणि आमदार रोहित पवार उपस्थित नव्हते. शरद पवार दौऱ्यावर जाणार असल्याने बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत, तर रोहित पवार पूर्वनियोजित परदेश दौऱ्यावर असल्याने अनुपस्थित होते.

दहा नव्या प्रवक्त्यांची निवड

पक्षाकडून दहा नव्या प्रवक्त्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये जितेंद्र आव्हाड, क्लाईड क्रास्टो, भीमराव हत्तीअंबीरे, अनिश गवांदे, फैजल मिर्झा, महेबूब शेख, प्रवीण कुंटे, प्रशांत सोनबा वीरकर, हेमाताई पिंपळे आणि डॉ. चंद्रकांत बारेला यांचा समावेश आहे.

या बैठकीला कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, निलेश लंके, माजी खासदार फौजिया खान आणि माजी आमदार अशोक पवार यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button