समृद्धी महामार्गावर गॅसगळती; ३० किमी अंतरावरील वाहतूक धुळे-सोलापूर महामार्गावर वळवली
टाकळीवाडी येथे गेलच्या गॅस वाहिनीला गळती; हडस पिंपळगाव ते माळीवाडा मार्गावर खबरदारी म्हणून वाहतूक बंद

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गालगत टाकळीवाडी (ता. गंगापूर) येथे गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती लागल्याची घटना घडली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून समृद्धी महामार्गावरील साखळी क्रमांक ४४७ ते ४७० दरम्यानची सुमारे ३० किलोमीटरची वाहतूक धुळे-सोलापूर महामार्गावर वळविण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिली.
टाकळीवाडी येथे गॅस वाहिनीला गळती झाल्याची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या. घटनास्थळी गेल कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले असून, अग्निशमन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे.
मुंबईकडून येणारी वाहने हडस पिंपळगाव इंटरचेंजवरून वळणार
खबरदारी म्हणून हडस पिंपळगाव ते माळीवाडा या सुमारे ३० किलोमीटरच्या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
मुंबईकडून जाणारी वाहने हडस पिंपळगाव इंटरचेंजवरून उतरून धुळे-सोलापूर महामार्गावरून माळीवाडा येथे पुन्हा समृद्धी महामार्गावर प्रवेश करतील.
नागपूरकडून येणारी वाहने माळीवाडा इंटरचेंजवरून धुळे-सोलापूर महामार्गावर येऊन हडस पिंपळगाव येथे पुन्हा समृद्धी महामार्गावर प्रवेश करतील.
हेही वाचा – MPSCच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादीचे जनआंदोलन; जितेंद्र आव्हाडांचा इशारा
गॅस वाहिनीचा दाब कमी करण्याचे काम सुरू
दरम्यान, गेल कंपनीच्या तज्ज्ञांनी गॅस वाहिनीच्या दोन्ही बाजूंचे व्हॉल्व्ह बंद केले असून पाइपलाइनमधील दाब हळूहळू कमी होत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाधिकारी तसेच पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
गॅसगळतीची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर वाहतूक लवकरच पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही केली जात आहे.
वाहतूक माहितीसाठी हेल्पलाइन
समृद्धी महामार्गावरील वाहतूक आणि मार्गाबाबत अधिक माहितीसाठी नियंत्रण कक्षाशी 1800 233 22 33 किंवा 8181818155 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.





