लिपिक भरतीतील उमेदवारांना मोठा दिलासा; मुंबई उच्च न्यायालयाची टायपिंग टेस्ट रद्द
तांत्रिक अडचणींच्या तक्रारींची दखल; नव्याने अधिसूचना जारी होणार, परीक्षेची नवीन तारीखही जाहीर केली जाणार

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयातील लिपिक पदासाठी घेण्यात आलेली टायपिंग स्किल टेस्ट रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. विविध परीक्षा केंद्रांवर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याच्या उमेदवारांच्या तक्रारींची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला. आता या परीक्षेसाठी नव्याने अधिसूचना जारी करण्यात येणार असून, त्यानंतर परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली जाणार आहे.
राज्यातील १९ परीक्षा केंद्रांवर सुमारे ११ हजार उमेदवार टायपिंग टेस्ट देणार होते. मात्र, कल्याण, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, वाशिम, भंडारा यांसह काही परीक्षा केंद्रांवर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याच्या तक्रारी समोर आल्या.
सर्व्हर, की-बोर्ड आणि लॉगआऊटच्या तक्रारी
काही परीक्षा केंद्रांवर सर्व्हर बंद पडल्याच्या तक्रारी उमेदवारांनी केल्या. काही ठिकाणी की-बोर्ड व्यवस्थित काम करत नसल्याचे, तर परीक्षा सुरू असताना काही उमेदवारांचे कॉम्प्युटर अचानक लॉगआऊट झाल्याचेही समोर आले. त्यामुळे अनेक उमेदवारांना परीक्षा देताना अडचणींचा सामना करावा लागला.
कल्याण आणि छत्रपती संभाजीनगर येथील काही परीक्षा केंद्रांवर उमेदवारांनी आंदोलन करत परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली होती. कल्याणमधील एपीएमसी मार्केट येथील केंद्रावर ४०० हून अधिक उमेदवारांनी आंदोलन केले.
हेही वाचा – मोहन भागवतांचा न्यूयॉर्कमध्ये ‘विविधतेतील एकते’चा संदेश; मानवतेला सर्वाधिक महत्त्व
परीक्षा केंद्रावर पोहोचूनही परीक्षा देता आली नाही
तांत्रिक अडचणींमुळे वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या काही उमेदवारांनाही परीक्षा देता आली नसल्याचे स्थानिक प्रशासनाने लेखी स्वरूपात मान्य केले होते. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेबाबत उमेदवारांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.
मुंबई उच्च न्यायालयाकडून परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, परीक्षा पूर्ण करण्यासाठी बाहेरील विक्रेते किंवा तृतीय पक्ष परीक्षा एजन्सीची मदत घेण्यात आली होती. तांत्रिक अडचणी नेमक्या कोणत्या कारणामुळे निर्माण झाल्या, याची चौकशी करण्यात येत आहे.
रजिस्ट्रारकडूनही तांत्रिक अडचणींची दखल
रविवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात राज्यातील परीक्षा एकूणच सुरळीत पार पडल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, कल्याण, छत्रपती संभाजीनगरसह काही केंद्रांवर तांत्रिक अडचणींबाबत तक्रारी प्राप्त झाल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते.
आता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार टायपिंग स्किल टेस्ट रद्द करण्यात आली आहे. नवीन अधिसूचना आणि परीक्षेची नवी तारीख अधिकृतरीत्या जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या निर्णयामुळे प्रभावित झालेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.




