डॉ. चित्तरंजन पुरंदरे यांच्या वैद्यकीय योगदानाचा गौरव; आत्मचरित्राचे प्रकाशन
महिला आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनातील प्रदीर्घ सेवेला मानाचा मुजरा; ‘हँड्स दॅट हील्ड, अ हार्ट दॅट लेड’चे प्रकाशन

मुंबई : वैद्यकीय क्षेत्रात पाच दशकांहून अधिक काळ निःस्वार्थ सेवा बजावत हजारो रुग्णांना उपचार देणारे, अनेक वैद्यकीय विद्यार्थ्यांना घडविणारे आणि संशोधनाला नवी दिशा देणारे प्रा. डॉ. चित्तरंजन पुरंदरे यांच्या कार्याचा गौरव सोहळा मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडला. यावेळी त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘हँड्स दॅट हील्ड, अ हार्ट दॅट लेड’ या आत्मचरित्राचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर आणि डॉ. पुरंदरे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
‘डॉ. पुरंदरे यांचे कार्य तरुणांसाठी प्रेरणादायी’
मंत्री छगन भुजबळ यांनी डॉ. पुरंदरे यांच्या कार्याचा गौरव करताना ते केवळ उत्कृष्ट चिकित्सक नसून शिक्षक आणि संशोधक म्हणूनही त्यांचे योगदान मोठे असल्याचे सांगितले. आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे १४० हून अधिक संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत.
आत्मचरित्र म्हणजे केवळ कामांची यादी नसून एका काळाचा इतिहास असतो. ज्ञान, संशोधन आणि कौशल्यांचा उपयोग समाजसेवेसाठी झाला पाहिजे, असा प्रेरणादायी संदेश डॉ. पुरंदरे यांच्या जीवनप्रवासातून मिळतो. त्यांचे कार्य तरुणांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे भुजबळ म्हणाले.
हेही वाचा – समृद्धी महामार्गावर गॅसगळती; ३० किमी अंतरावरील वाहतूक धुळे-सोलापूर महामार्गावर वळवली
महिला आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी डॉ. पुरंदरे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील सेवेला महिला आरोग्याबाबत जनजागृतीची जोड दिल्याचे नमूद केले. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि सेवाभावी वृत्तीचा लाभ असंख्य रुग्णांना झाला असून, नव्या पिढीतील वैद्यकीय विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही डॉ. पुरंदरे यांनी आपल्या कार्यातून जगभरात वेगळी ओळख निर्माण केल्याचे सांगितले. त्यांच्या आत्मचरित्रातून त्यांच्या जीवनाचे विविध पैलू समोर येतील, असे त्यांनी नमूद केले.
‘आरोग्य क्षेत्रासाठी त्यांचे योगदान अभिमानास्पद’
खासदार सुप्रिया सुळे यांनी डॉ. पुरंदरे यांच्या योगदानाचे कौतुक केले. रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी यांचा समन्वय साधत त्यांनी महिलांच्या आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम केले. महिलांच्या आरोग्याकडे संवेदनशीलतेने पाहण्याची दृष्टी समाजात रुजविण्यात त्यांचे योगदान मोठे असल्याचे सुळे यांनी सांगितले.
‘पुरंदरे तंत्रा’ला आंतरराष्ट्रीय मान्यता
आपल्या मनोगतात डॉ. पुरंदरे यांनी महिलांच्या आरोग्यसेवेसाठी काम करण्याची संधी, तरुण डॉक्टर घडविणे आणि मातामृत्यू रोखण्याच्या प्रयत्नांत योगदान देता येणे, हीच आपल्या कारकीर्दीतील समाधानाची बाब असल्याचे सांगितले.
गर्भाशयातील उपचारपद्धती, गर्भशस्त्रक्रिया तसेच गर्भाशयमुखाच्या कर्करोगावरील शस्त्रक्रियात्मक उपचारांमध्ये त्यांनी नवे प्रयोग केले. यापैकी काही सुधारित पद्धतींना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली असून त्या ‘पुरंदरे तंत्र’ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. चित्तरंजन पुरंदरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यांच्या प्रदीर्घ वैद्यकीय सेवेचा आणि संशोधनातील योगदानाचा गौरव करत आत्मचरित्राच्या प्रकाशनाने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.




