राज्यात पावसाची प्रतीक्षा संपणार? 26 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा
पुढील 24 तासांत जोरदार पावसाचा अंदाज; ताशी 90 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

मुंबई : राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे पिकांवर संकट ओढावले असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक भागांत पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, आता पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असून आगामी काळात राज्यासह देशातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने 30 ऑगस्ट रोजी पुढील 24 तासांसाठी 26 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याच काळात काही भागांत ताशी 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही डोंगराळ भागांत भूस्खलनाचा धोका असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
26 राज्यांना पावसाचा इशारा
हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, जम्मू-काश्मीर, लडाख, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, आसाम, त्रिपुरा, नागालँड, सिक्कीम, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
काही भागांत वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याचा अंदाज असल्याने प्रशासन आणि नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाऊस झाल्यास पाण्याअभावी संकटात सापडलेल्या पिकांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – पुराच्या पाण्यात वाहून आलेला बँकेचा लॉकर फोडला; 29 जण ताब्यात, कोट्यवधींची रोकड जप्त
महाराष्ट्रातही पावसासाठी अनुकूल वातावरण
महाराष्ट्रातही आता पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. पुढील 24 तासांत दक्षिण-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
राज्यात जुलैच्या पहिल्या आणि तिसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस झाला होता. मात्र, त्यानंतर पावसाने मोठी दडी मारल्याने अनेक भागांतील पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर वाढणार?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा असलेल्या भागातील पिकांना आवश्यक पाणी मिळू शकते.
आगामी काही दिवसांत अपेक्षित पाऊस झाल्यास पिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून, राज्यातील पावसाची तूट काही प्रमाणात भरून निघण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे आता हवामान विभागाच्या पुढील अंदाजाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.





