Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

शेतीला AI आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड; उत्पादन खर्च ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा फडणवीसांचा निर्धार

कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन; संशोधन, अन्नप्रक्रिया आणि तंत्रज्ञानातून तरुणांना शेतीकडे वळविण्याचे आवाहन

नाशिक : बहुजन हिताय-बहुजन सुखाय या तत्त्वावर काम करणारी मराठा विद्या प्रसारक संस्था राज्यातील अग्रगण्य संस्था असून, नाशिक जिल्ह्याच्या जडणघडणीत संस्थेचा मोठा वाटा आहे. संस्थेच्या माध्यमातून दोन लाखांहून अधिक विद्यार्थी आणि दोन हजारांहून अधिक शिक्षक कार्यरत असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि AIच्या माध्यमातून शेती अधिक फायदेशीर करण्यावर भर दिला.

नाशिक जिल्हा हा कृषीप्रधान जिल्हा असून देशाच्या द्राक्ष निर्यातीपैकी सुमारे ८० टक्के निर्यात नाशिकमधून होते, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. शेतकरी मोठ्या मेहनतीने उत्पादन घेत असला तरी वाढता उत्पादन खर्च, हमीभाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चढ-उतार यांसारख्या अनेक आव्हानांना त्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कांद्याच्या दराचा संदर्भ देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या खास शैलीत मिश्किल टिप्पणीही केली. “आमच्या डोळ्यात वर्षातून दोनदा कांदा पाणी आणतो. आता कांद्याला भाव चांगला आहे. त्यामुळे या कार्यक्रमात कांदा भेट मिळाली नाही,” असे म्हणत त्यांनी उपस्थितांमध्ये हास्याची लहर निर्माण केली.

शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संशोधन होणे आवश्यक आहे. खतांचे व्यवस्थापन आणि पाण्याचा योग्य वापर यासह विविध बाबींवर शासन काम करत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खराब होऊन उत्पादकता कमी होण्याचा धोका आहे. त्यामुळे शाश्वत शेतीच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.

इस्रायलमध्ये कमी पाण्यात आणि प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीत शेतीत मोठी क्रांती घडवून आणण्यात आली. त्याच धर्तीवर उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून महाराष्ट्रातील शेती अधिक उत्पादक आणि फायदेशीर करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा –  सप्टेंबरपासून ‘डबल महागाई’चा झटका; दूध आणि रिक्षा-टॅक्सी प्रवास महागणार

AIच्या मदतीने उत्पादन खर्च कमी करण्याचे प्रयत्न

शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन खर्च २५ ते ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे आणि उत्पादकता वाढविण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

शेतकऱ्यांना मशागतीपासून कापणीपर्यंत मार्गदर्शन मिळावे यासाठी अॅप विकसित करण्यात आले आहे. शेतकरी या अॅपच्या माध्यमातून आपल्या शेतीशी संबंधित प्रश्न विचारू शकतो आणि त्याला आवश्यक माहिती मिळू शकते. तसेच पिकाचा फोटो काढून अपलोड केल्यानंतर संभाव्य रोग, हवामानातील बदल आणि पिकासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन मिळण्याची सुविधा विकसित केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

तरुणांना शेतीकडे वळविण्याचे आवाहन

आजची तरुण पिढी शेतीपासून दूर जात असल्याची चिंता व्यक्त करत, कृषी महाविद्यालयांच्या माध्यमातून तरुणांना पुन्हा शेतीशी जोडता येईल, असे फडणवीस म्हणाले. आधुनिक शेती, अन्नप्रक्रिया उद्योग आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीत रोजगार व व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण करता येतील.

शेतकरी वारंवार कर्जबाजारी होऊ नये, यासाठी केवळ कर्जमाफी पुरेशी नसून शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक आहेत. उत्पादन वाढविणे, खर्च कमी करणे आणि अन्नप्रक्रियेसारख्या पूरक व्यवसायांना चालना देणे या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर देण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button