हरियाणवी गायक अंकित बालियानची गोळ्या झाडून हत्या; जिमबाहेर अज्ञात हल्लेखोरांचा थरार
दोन दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांनी केला गोळीबार; आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना, हत्येच्या निषेधार्थ समर्थकांकडून रास्ता रोको

शामली : हरियाणवी गायक आणि यूट्यूबर अंकित बालियान याची उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. जिममधून व्यायाम करून बाहेर पडत असताना दोन दुचाकींवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात बालियानचा मृत्यू झाला.
ही घटना कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. बालियान नेहमीप्रमाणे जिममध्ये व्यायाम करण्यासाठी गेला होता. सायंकाळी साडेसहा ते पावणेसातच्या सुमारास तो जिममधून बाहेर पडत असताना हल्लेखोरांनी त्याच्यावर अंदाजे १५ ते २० गोळ्या झाडल्याचे जिमचे मालक रवी शर्मा यांनी सांगितले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
शामलीचे पोलिस अधीक्षक एनपी सिंह यांनी हत्येचा तपास सुरू असल्याचे सांगितले. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची अनेक पथके तयार करण्यात आली आहेत. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अंकित बालियानच्या हत्येची माहिती मिळताच कुटुंबीय आणि समर्थकांनी संताप व्यक्त केला. घटनास्थळापासून सुमारे ५० मीटर अंतरावर असलेल्या वर्मा मार्केट तिराहाजवळ दिल्ली-मुझफ्फरनगर रस्ता रोखून धरत हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
हेही वाचा – लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! जुलैचा ₹१,५०० हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी अंकित बालियानच्या हत्येचा निषेध केला. उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी हत्येमागे राजकीय वैर आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी केली. बालियानच्या हत्येनंतर जाट समाजातही संताप असल्याचे यादव यांनी म्हटले.
अंकित बालियान आगामी पंचायत निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. मात्र, त्याने अधिकृतपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती किंवा त्याच्या हत्येचा निवडणुकीशी संबंध आहे, याची अधिकृत पुष्टी पोलिसांकडून झालेली नाही.
बालियानच्या यूट्यूब चॅनेलवर साडेतीन लाखांहून अधिक सदस्य होते. हरियाणवी गाणी आणि परफॉर्मन्समुळे त्याने मोठा चाहतावर्ग निर्माण केला होता. तो शामलीतील बंटिखेडा गावचा रहिवासी होता. २०२३ मध्ये परवानगीशिवाय रोड शो केल्याच्या आरोपावरून त्याच्याविरोधात शामलीमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली होती.





