TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अमरावती रुग्णालयातील आगीप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार; बावनकुळेंचा इशारा

नवजात शिशूंच्या मृत्यूची चौकशी सुरू; तांत्रिक किंवा अग्निसुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी आढळल्यास कठोर कारवाई

अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता कक्षात (SNCU) लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, तांत्रिक बिघाड किंवा अग्निसुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी चौकशीत आढळल्यास संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

सोमवारी पहाटे सुमारास नवजात शिशू कक्षात अचानक आग लागली. या दुर्घटनेत उपचार घेत असलेल्या तीन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने हालचाल करत इतर सहा बालकांना सुरक्षित बाहेर काढले. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर शेजारील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आगीचे नेमके कारण चौकशीनंतर स्पष्ट होणार

बावनकुळे यांनी सांगितले की, ही घटना तांत्रिक चूक, अग्निशमन यंत्रणेतील बिघाड किंवा अन्य कारणामुळे घडली का, हे चौकशीच्या अहवालानंतर स्पष्ट होईल. “तांत्रिक बाबींमध्ये चुकी आढळल्यास मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल. पोलीस कसून चौकशी करत आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मृत नवजात बालकांना श्रद्धांजली वाहिली. मृत बालकांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी सरकार आणि प्रशासन ठामपणे उभे असून, जखमी बालकांना आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  Miss Universe India 2026 : केरळची 19 वर्षीय काझिया लिझ मेजो ठरली ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’

अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी उपाययोजना

अमरावतीतील दुर्घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, भविष्यात राज्यात किंवा अमरावतीत अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

एसएनसीयूमध्ये कमी वजनाची, कमी दिवसांची आणि गंभीर अवस्थेतील नवजात बालके उपचार घेत असतात. त्यामुळे या कक्षातील अग्निसुरक्षा यंत्रणा आणि तांत्रिक व्यवस्थेची तपासणी आता महत्त्वाची ठरणार आहे. चौकशीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button