गिनीच्या राजधानीत भीषण दुर्घटना! कचऱ्याचा डोंगर कोसळून २२ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Guinea Dumping Yard Landslide | पश्चिम आफ्रिकेतील गिनी या देशाची राजधानी कोनाक्री येथे मुसळधार पावसामुळे एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली आहे. कोनाक्री येथील दार एस सलाम परिसरात कचऱ्याचा महाकाय डोंगर शेजारील झोपड्यांवर कोसळल्याने (भूस्खलन) किमान २२ नागरिकांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले असून, त्यापैकी सहा जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
गिनीच्या नागरी संरक्षण सेवेने (Civil Protection Service) दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले. त्यामुळे संपूर्ण डोंगर खचून खाली आला आणि पायथ्याशी असलेल्या अनेक झोपड्या चिखल व कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली पूर्णपणे गाडल्या गेल्या.
हेही वाचा
३ मोफत LPG सिलिंडर, महिलांना मोफत बस प्रवास; विधानसभेत मुख्यमंत्री विजय यांची मोठी घोषणा!
या दुर्घटनेनंतर बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन युद्धपातळीवर मदत व बचाव कार्य सुरू केले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, कचऱ्याच्या डोंगराचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने स्थानिक रहिवाशांना हा परिसर रिकामा करण्याच्या नोटिसा आधीच बजावल्या होत्या. नोटिशीनंतर अनेकांनी स्थलांतर केले होते; मात्र जे लोक अद्याप तेथेच राहत होते, ते या भीषण दुर्घटनेचे बळी ठरले.





