गणेशोत्सवात मुंबई मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; मध्य रेल्वेला मेगाब्लॉक टाळण्याच्या सूचना
भाविकांसाठी मेट्रो सेवा रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश; अतिरिक्त लोकल फेऱ्या आणि स्थानकांवर कडक सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन

मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात मुंबई आणि उपनगरांमध्ये गणेशभक्तांची मोठी गर्दी होणार असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाविकांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि अडथळामुक्त व्हावा यासाठी मुंबई मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करून सेवा रात्री उशिरापर्यंत, तसेच आवश्यकतेनुसार मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्याच्या सूचना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मेट्रो प्रशासनाला दिल्या आहेत.
त्याचबरोबर गणेशोत्सवाच्या कालावधीत मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गांवर नियमित मेगाब्लॉक तसेच रात्रकालीन ब्लॉक घेऊ नयेत, असे निर्देशही देण्यात आल्याची माहिती लोढा यांनी दिली.
मेट्रोच्या दोन फेऱ्यांमधील अंतर कमी करणार
गणेशोत्सवात मुंबईसह उपनगरांतील विविध गणेश मंडळांना भेट देण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने मेट्रो आणि लोकल रेल्वेचा वापर करतात. त्यामुळे गर्दीच्या वेळेत मेट्रोच्या दोन फेऱ्यांमधील अंतर अर्थात ‘हेडवे’ कमी करून अधिक फेऱ्या चालविण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच रात्री गणेश दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांसाठी मेट्रोची शेवटची फेरी उशिरापर्यंत सुरू ठेवून आवश्यकतेनुसार विशेष फेऱ्यांची व्यवस्था करण्यात यावी, असेही सांगण्यात आले आहे.
हेही वाचा – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’चे भव्य आयोजन
अनंत चतुर्दशीपर्यंत मेगाब्लॉक टाळण्याच्या सूचना
गणेशोत्सवाच्या काळात मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांवर प्रवाशांचा मोठा ताण येण्याची शक्यता आहे. दिवस-रात्र रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी होणार असल्याने गणेशोत्सवाच्या प्रारंभापासून अनंत चतुर्दशीपर्यंत मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गांवर नियमित मेगाब्लॉक किंवा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
गर्दीच्या काळात आणि रात्री गणेश दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांसाठी अतिरिक्त उपनगरीय विशेष लोकल फेऱ्या चालविण्याचेही नियोजन करण्यात येणार आहे.
प्रमुख स्थानकांवर अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था
गणेशोत्सवातील गर्दी लक्षात घेता प्रमुख रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त रेल्वे सुरक्षा बल आणि महाराष्ट्र सुरक्षा रक्षक तैनात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवाशांची सुरक्षा आणि गर्दी व्यवस्थापनासाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे.
मेट्रो आणि रेल्वे स्थानकांवर गर्दी नियंत्रणासाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे लोढा यांनी स्पष्ट केले.
तिकीट आणि प्रवासी सुविधाही पूर्ण क्षमतेने सुरू राहणार
भाविकांना तिकीट काढताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी मेट्रोवरील सर्व तिकीट काऊंटर, ऑटोमेटिक तिकीट व्हेंडिंग मशिन्स, डिजिटल आणि क्यूआर तिकीट प्रणाली मेट्रोची शेवटची फेरी होईपर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच मेट्रो स्थानकांवरील लिफ्ट, एस्केलेटर, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि प्राथमिक उपचार केंद्रे मेट्रो सेवा सुरू असेपर्यंत उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
गर्दीमुळे वाहतुकीत कोणतेही अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी मेट्रो आणि रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त सेवा, प्रभावी सुरक्षा व्यवस्था आणि गर्दी नियंत्रणाची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.





