ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रस्तावित मेट्रो मार्गीकेत लोकहिताच्या दृष्टीने बदल करावेत..!

नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांच्या सूचना; 'स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण' स्थानकासह नवीन स्टेशनची मागणी

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पुणे व पिंपरी-चिंचवड शहराची वाटचाल वेगाने ‘मेट्रोसिटी’कडे होत आहे. वाहतूककोंडीमुक्त, आधुनिक आणि सर्वसमावेशक शहर उभारण्याच्या दृष्टीने मेट्रो प्रकल्पाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोचे जाळे अधिक वेगाने विस्तारत असून, प्रस्तावित भक्तीशक्ती–वाकड–नाशिक फाटा–चाकण मेट्रो मार्गिकेच्या सविस्तर प्रकल्प अहवालात (DPR) महत्त्वपूर्ण बदल सुचवत नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांनी नागरिकांच्या हिताचे चार महत्त्वाचे प्रस्ताव मांडले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगुळकर सभागृहात प्रस्तावित पुणे मेट्रो टप्पा-२, नवीन ERTS, सार्वजनिक शौचालय धोरण आणि सविस्तर प्रकल्प अहवालाचे (DPR) सादरीकरण करण्यात आले. या बैठकीत डॉ. सुहास कांबळे यांनी परिसराच्या गरजा लक्षात घेऊन मेट्रो प्रकल्प अधिक लोकाभिमुख करण्यासाठी चार ठोस सूचना मांडल्या.

डॉ. सुहास कांबळे यांच्या चार महत्त्वाच्या सूचना खालीलप्रमाणे

1) PIECC स्थानकाला ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ नाव द्यावे

PIECC परिसरात प्रस्तावित मेट्रो स्थानकाला ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ असे नाव देण्याची मागणी त्यांनी केली. या नावामुळे स्थानिक अस्मिता आणि ऐतिहासिक ओळख अधिक दृढ होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

2) साईनाथ हॉस्पिटल–RTO लिंक रोड येथे नवीन स्टेशन

गोडाऊन चौक आणि PIEC या दोन स्थानकांदरम्यान साईनाथ हॉस्पिटल–RTO लिंक रोड परिसरात स्वतंत्र मेट्रो स्थानक उभारण्याची सूचना करण्यात आली. या भागातील वाढती लोकवस्ती, रुग्णालये, कार्यालये आणि दैनंदिन प्रवाशांचा विचार करता हे स्थानक नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरेल, असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा

बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल राजकीय मैदानात उतरणार? भाजप प्रवेशानंतरच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

3) मेट्रो डेपो PIECC ऐवजी चाकण MIDC मध्ये करावा

मेट्रो डेपोकरिता PIECC जवळील प्रस्तावित जागेऐवजी चाकण MIDC मधील योग्य जागा निश्चित करण्याची मागणी त्यांनी केली. यामुळे भविष्यातील विस्ताराला गती मिळेल आणि नियोजन अधिक प्रभावी होईल, असा त्यांचा युक्तिवाद होता.

4) ‘सेन्चुरी एन्का’ऐवजी ‘इंद्रायणीनगर’ स्थानक

‘सेन्चुरी एन्का’ या प्रस्तावित स्थानकाचे नाव बदलून सर्वपरिचित ‘इंद्रायणीनगर मेट्रो स्थानक’ असे ठेवण्याचीही त्यांनी सूचना केली. स्थानिक नागरिकांना सहज ओळखता येईल, असा हा बदल असल्याचे त्यांनी सांगितले.

या चारही सूचनांचा समावेश सविस्तर प्रकल्प अहवालात करून सुधारित DPR आगामी महापालिका सभेसमोर मंजुरीसाठी ठेवावा, अशी मागणी डॉ. सुहास कांबळे यांनी केली.

विशेष म्हणजे त्यांच्या सर्व सूचनांना महापौर रवि लांडगे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे या प्रस्तावांचा पुढील प्रक्रियेत गांभीर्याने विचार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सादरीकरणाला महापालिकेचे नगरसदस्य, नगरसदस्या, पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भोसरीच्या विकासाला नवी दिशा

भोसरी आणि चाकण या औद्योगिक पट्ट्याला आधुनिक सार्वजनिक वाहतुकीची जोड देण्यासाठी ही मेट्रो मार्गिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्यामुळे या भागातील पायाभूत सुविधा अधिक वेगाने विकसित होत असून, नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांनी मांडलेल्या या लोकाभिमुख सूचनांमुळे भविष्यातील मेट्रो आराखडा अधिक सक्षम, स्थानिक गरजांशी सुसंगत आणि नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button