‘अंतर्गत लोकशाहीचा वापर केला तर पक्ष फुटणार नाहीत’; राहुल नार्वेकरांची टिप्पणी चर्चेत
पंढरपुरात Gen-Z विद्यार्थ्यांशी संवाद; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाच्या न्यायप्रविष्ट प्रकरणावर बोलण्यास नार्वेकरांचा नकार

पंढरपूर : महाराष्ट्रातील ‘Gen-Z’ पिढी महाराष्ट्रासोबतच असल्याचे सांगत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राजकीय पक्षांमधील अंतर्गत लोकशाहीवर भाष्य केले. भारतीय जनता पार्टीच्या बैठका कोणत्याही ‘ऑपरेशन’साठी होत नसल्याचे सांगताना, “कुठल्याही पक्षाने अंतर्गत लोकशाहीचा वापर करून आपल्या लोकप्रतिनिधींच्या भावना समजून घेतल्या, तर पक्ष फुटणारच नाहीत,” अशी टिप्पणी त्यांनी केली.
पंढरपूर येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमध्ये राहुल नार्वेकर यांनी Gen-Z पिढीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध राजकीय प्रश्नांवर भाष्य केले. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाबाबत सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हासंदर्भातील प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले. आपण विधानसभा अध्यक्ष तसेच कायद्याचे विद्यार्थी असल्याने न्यायप्रविष्ट विषयावर भाष्य करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर सलग सुनावणी सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करत निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा असल्याचे विविध दाखले न्यायालयासमोर मांडले. त्यानंतर वकील देवदत्त कामत यांनीही युक्तिवाद केला.
हेही वाचा – गणेशोत्सवात मुंबई मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; मध्य रेल्वेला मेगाब्लॉक टाळण्याच्या सूचना
Gen-Z पिढीच्या राजकीय सहभागाबाबतही नार्वेकर यांनी भाष्य केले. राहुल गांधी सध्या Gen-Z सोबत आंदोलन करत असल्याचा संदर्भ देत त्यांनी, भारताला सर्वोत्तम देश घडविण्याचे काम युवापिढी करत असल्याचे म्हटले.
लोकप्रतिनिधींनी भान ठेवावे आणि आपल्या राजकारणासाठी युवा पिढीला चेतवून राजकारण करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. राजकारणापेक्षा युवापिढीला योग्य मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे नार्वेकर यांनी नमूद केले.
महाराष्ट्राच्या विधानसभेत बसून युवकांच्या अपेक्षा आणि इच्छा समजून घेणे गरजेचे आहे. त्यानुसार कायदे आणि धोरणांबाबत निर्णय घ्यायचे असतील, तर युवकांशी थेट संवाद साधणे आवश्यक आहे, असे नार्वेकर यांनी सांगितले.
याच उद्देशाने आपण Gen-Z पिढीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात चार वर्षांनंतर सलग मॅरेथॉन सुनावणी सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या वतीने कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला आहे. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांचा निर्णय कसा चुकीचा आहे आणि पक्षांतरबंदी कायद्याच्या तरतुदींशी तो कसा विसंगत आहे, याबाबतचे मुद्दे न्यायालयासमोर मांडण्यात आल्याचे वृत्त आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या सोमवारी होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.





