पिंपरी-चिंचवड ते भीमाशंकर सायकल राईड अन् भोरगिरी–भीमाशंकर ट्रेकला उत्स्फूर्त प्रतिसाद
आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून १३० हून अधिक सायकलिस्ट व ट्रेकर्सचा सहभाग; आरोग्य, साहस आणि निसर्गप्रेमाचा संदेश

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
आरोग्य, साहस आणि निसर्गप्रेमाचा संदेश देणाऱ्या सायकल मित्र परिवाराच्या वतीने आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि कामगार नेते सचिन लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड ते भीमाशंकर सायकल राईड तसेच भोरगिरी–भीमाशंकर ट्रेकचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला सायकलिस्ट आणि ट्रेकर्सचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल १३० हून अधिक सायकलिस्ट व ट्रेकर्सनी या साहसी उपक्रमात सहभाग घेतला.
सायकल मित्र परिवाराचे अध्यक्ष बापू शिंदे, उपाध्यक्ष सुनील सैंदाने, निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलचे वैद्य निलेश लोंढे आणि संपूर्ण सायकल मित्र टीमच्या नियोजनातून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. गेल्या दहा वर्षांपासून सायकल मित्र परिवार सातत्याने सायकलवारी आणि ट्रेकचे आयोजन करत असून, लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटातील नागरिकांना या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले जाते.
पहाटे ४ वाजता मोशी येथील स्पाइन सिटी सर्कल येथून सायकल राईडला सुरुवात झाली. सायकलस्वारांनी उत्साहाने भीमाशंकरच्या दिशेने प्रवास केला. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता भोरगिरी येथून भीमाशंकरच्या दिशेने ट्रेकिंगला सुरुवात करण्यात आली.
ऊन-पावसाचा लपंडाव, हिरवाईने नटलेला परिसर आणि आल्हाददायक निसर्गरम्य वातावरण अशा उत्साही वातावरणात ट्रेकर्सनी तब्बल ७.५ किलोमीटरचा चढ आणि ७.५ किलोमीटरचा उतार पूर्ण केला. निसर्गाच्या सान्निध्यातील या प्रवासामुळे सहभागींच्या उत्साहात आणखी भर पडली.
हेही वाचा
प्रस्तावित मेट्रो मार्गीकेत लोकहिताच्या दृष्टीने बदल करावेत..!
पिंपरी-चिंचवड ते भीमाशंकर सायकल राईड अन् भोरगिरी–भीमाशंकर ट्रेकला उत्स्फूर्त प्रतिसाद
आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून १३० हून अधिक सायकलिस्ट व ट्रेकर्सचा सहभाग; आरोग्य, साहस आणि निसर्गप्रेमाचा संदेश pic.twitter.com/05iQhawqvp
— Mahaenews (@mahae_news) August 25, 2026
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सायकल मित्र परिवाराचे अध्यक्ष बापू शिंदे, उपाध्यक्ष सुनील सैंदाने आणि संपूर्ण सायकल मित्र टीमचे कौतुक करण्यात आले. तसेच सहभागी सर्व सायकलिस्ट, ट्रेकर्स आणि सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे आयोजकांकडून मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
‘केवळ ट्रेक नव्हे, तर स्वतःला जाणून घेण्याचा अनुभव!’
या उपक्रमामुळे सहभागींच्या शारीरिक क्षमतेसोबतच मानसिक क्षमतेचीही कसोटी लागली. चढ-उतार, बदलते हवामान आणि आव्हानात्मक वाट यावर मात करत सर्वांनी ट्रेक यशस्वीपणे पूर्ण केला. सायंकाळी ६ वाजता ट्रेक पूर्ण झाला. त्यानंतर रात्री ७ वाजता परतीचा प्रवास सुरू करून रात्री १० वाजता सहभागी आपल्या घरी पोहोचले. दिवसभराच्या साहसी प्रवासामुळे शरीर थकले असले तरी निसर्गाच्या सान्निध्यात अनुभवलेल्या आनंदामुळे मन मात्र समाधानाने आणि उत्साहाने भरून गेले.
दहा वर्षांची परंपरा कायम
सायकल मित्र परिवार गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने अशा सायकल राईड आणि ट्रेकचे आयोजन करत आहे. केवळ साहसी उपक्रम म्हणून नव्हे, तर निरोगी जीवनशैली, व्यायाम, निसर्गसंवर्धन, साहस आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारे व्यासपीठ म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जाते. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि सचिन भैया लांडगे यांच्या मार्गदर्शनातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद हा नागरिकांमध्ये आरोग्य आणि फिटनेसबाबत वाढत असलेल्या जागरूकतेचे प्रतीक ठरला.





