गणेशभक्तांसाठी मोठा दिलासा! एसटीच्या ग्रुप बुकिंगवरील 30 टक्के अतिरिक्त शुल्क रद्द
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना स्वस्तात एसटी प्रवासाची संधी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर निर्णय

मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, चाकरमान्यांची गणपतीसाठी गावी जाण्याची तयारी जोरात सुरू आहे. रेल्वे आणि बसचे बुकिंग तीन महिन्यांआधीच फुल झाल्याने गणेशभक्तांसमोर प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा देणारा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. संपूर्ण एसटी बस आरक्षित करण्यासाठी आकारण्यात येणारे 30 टक्के अतिरिक्त शुल्क यंदा रद्द करण्यात आले आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर हा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो चाकरमान्यांना कमी खर्चात एसटीने प्रवास करता येणार आहे.
गणेशोत्सव आणि एसटी महामंडळाचे कोकणवासीयांशी अनेक वर्षांपासून घट्ट नाते आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमधून दरवर्षी हजारो कोकणवासी गणेशोत्सवासाठी एसटीने आपल्या गावी जातात. गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी सुमारे 5 हजार एसटी बसेस आरक्षित केल्या जातात.
प्रवाशांना त्यांच्या गावी सोडल्यानंतर या बसेस रिकाम्या परत आणाव्या लागतात. त्यामुळे एसटी महामंडळाला इंधन, तसेच चालक आणि वाहकांच्या अतिरिक्त कामाचा खर्च सहन करावा लागतो.
डिझेलच्या वाढलेल्या किमती आणि कर्मचाऱ्यांच्या अतिकालीन भत्त्यात झालेली वाढ यामुळे एसटी महामंडळाचा खर्च वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण बस आरक्षणासाठी 30 टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
हेही वाचा – मराठी न येणाऱ्या चालकांविरोधात सरकारचं मोठं पाऊल, राज्यभर विशेष तपासणी मोहीम सुरू
मात्र, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे शुल्क रद्द करण्याची मागणी कोकणवासीय आणि विविध गणेशोत्सव मंडळांकडून करण्यात आली होती. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनेही देण्यात आली होती.
कोकणवासीयांच्या मागणीचा विचार करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिरिक्त शुल्क रद्द करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, यंदा एकेरी गट आरक्षणावर (ग्रुप बुकिंग) 30 टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
या निर्णयाबाबतचे अधिकृत परिपत्रक एसटी महामंडळाकडून लवकरच जारी करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
अतिरिक्त शुल्क रद्द केल्यामुळे एसटी महामंडळावर येणारा आर्थिक भार वाढणार आहे. हा अतिरिक्त भार इतर मार्गांवरील प्रवासी वाहतूक वाढवून भरून काढण्याच्या सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीच्या ग्रुप बुकिंगवरील 30 टक्के शुल्क रद्द झाल्याने यंदाच्या गणेशोत्सवात प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.




