उद्यमनगरमध्ये काँक्रीटीकरण व ब्लॉक दुरुस्तीची कामे; नागरिकांना दिलासा
नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर यांचा पुढकार : प्रभागातील नागरिकांच्या सोयीसाठी तातडीने दुरुस्तीची कामे

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी : प्रभाग क्रमांक ९ मधील उद्यमनगर परिसरातील नागरिकांना ये-जा करताना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी काँक्रीटीकरण तसेच ब्लॉक दुरुस्तीची विविध कामे करण्यात आली आहेत. परिसरातील खराब झालेल्या रस्ते व पादचारी मार्गांच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार तातडीने दुरुस्ती करून नागरिकांची गैरसोय कमी करण्यात आली.
उद्यमनगर परिसरातील काही ठिकाणी रस्त्यांचे काँक्रीटीकरण तसेच ब्लॉकची दुरुस्ती आवश्यक असल्याने नागरिकांकडूनही याबाबत समस्या मांडण्यात आल्या होत्या. या समस्यांची दखल घेत आवश्यक त्या ठिकाणी तातडीने कामे करून परिसरातील दळणवळण अधिक सुलभ करण्यात आले आहे.
हेही वाचा – गणेशभक्तांसाठी मोठा दिलासा! एसटीच्या ग्रुप बुकिंगवरील 30 टक्के अतिरिक्त शुल्क रद्द
दैनंदिन कामानिमित्त या परिसरातून मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा होत असते. त्यामुळे रस्ते, पदपथ आणि ब्लॉकची अवस्था चांगली राहणे आवश्यक आहे. नागरिकांना सुरक्षित व सुलभपणे ये-जा करता यावी, यासाठी प्रभागातील मूलभूत सुविधांकडे सातत्याने लक्ष देत आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्तीची कामे करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
माजी महापौर तथा नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर म्हणाल्या की, “नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या अडचणी दूर करणे हीच खरी लोकसेवा आहे. प्रभागातील नागरिकांना सुरक्षित, सुकर आणि दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी आवश्यक त्या ठिकाणी तातडीने दुरुस्तीची कामे केली जात आहेत. आपला प्रभाग, आपली जबाबदारी या भूमिकेतून प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत विकासकामे आणि आवश्यक दुरुस्तीची कामे सातत्याने करण्यावर भर दिला जात आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“उद्यमनगर परिसरातील नागरिकांना ये-जा करताना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक त्या ठिकाणी काँक्रीटीकरण आणि ब्लॉक दुरुस्तीची कामे तातडीने करण्यात आली आहेत. प्रभागातील प्रत्येक भागातील मूलभूत सुविधांकडे सातत्याने लक्ष देऊन नागरिकांच्या अडचणी प्रत्यक्षात दूर करणे, हीच आमची प्राथमिकता आहे. आपला प्रभाग, आपली जबाबदारी या भावनेतून नागरिकांना सुरक्षित, सुकर आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू.”
– डॉ. वैशाली घोडेकर, मा. महापौर, नगरसेविका.





